मतांच्या जोगव्यासाठी विविध भाषा

By Admin | Updated: January 5, 2015 00:38 IST2015-01-05T00:38:24+5:302015-01-05T00:38:24+5:30

लष्करी उत्पादन, आस्थापना आणि सेवा भागाच्या कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत वेगवेगळ्या समाजाचे नागरिक वास्तवास आहेत.

Different languages ​​for votes | मतांच्या जोगव्यासाठी विविध भाषा

मतांच्या जोगव्यासाठी विविध भाषा

पिंपरी : लष्करी उत्पादन, आस्थापना आणि सेवा भागाच्या कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत वेगवेगळ्या समाजाचे नागरिक वास्तवास आहेत. मराठीसह इतर भाषांत मतदार राजाशी संपर्क साधला जात आहे. प्रचारपत्रके आणि फिरत्या रिक्षावरील स्पीकरवर विविध भाषेत प्रचार रंगला आहे.
लष्करी विभागाच्या विविध कार्यालय आणि फॅक्टरीबरोबरच बाजारपेठ विस्तारली आहे. नागरी वस्ती वाढीस वाव नसला, तरी लोकसंख्या वाढत आहे. कॅन्टोन्मेंट भागात साधारणत: मराठीसह हिंदी भाषेचे प्रभुत्व अधिक आहे. तसेच इंग्रजी, उर्दू, गुजराथी, राजस्थानी भाषकांसह दक्षिण भारतीय नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. देशभरातील निरनिराळ्या राज्यांतील नागरिक येथे स्थायिक आहेत. त्यामुळे हा भाग ‘छोटा भारत’ म्हणून ओळखला जातो.
खडकी, देहूरोड आणि पुणे कॅन्टोन्मेंटची निवडणूक ११ जानेवारीला होत आहे. मतदारराजाशी संपर्क साधण्यासाठी मराठीसह त्याच्या मातृभाषेचा वापर केला जात आहे. मतदारांशी अधिक जवळीक साधण्यासाठी हे पर्याय अधिक परिणामकारक ठरत आहेत. सर्वसाधारणपणे मराठी भाषेचा वापर अधिक आहे.
लष्करी भागात आणि बाजारपेठेत हिंदी आणि इंग्रजीचा वापर अधिक होतो. हे लक्षात घेऊन हिंदी आणि इंग्रजीतही पत्रके वाटली जात आहेत. त्याचबरोबर मुस्लिमबहुल भागांत उर्दू भाषेत पत्रके दिली जात आहेत. त्याचबरोबर मशिदीबाहेर आवर्जून उभे राहून सलाम करीत मतासाठी विनवणी केली जात आहे. दक्षिण भारतीय भागात इंग्रजीसह तमिळ भागांत प्रचार पत्रके घरोघरी पोहचविली जात आहेत. ख्रिस्ती मतदारांपर्यत पोहचण्यासाठी चर्चचा आधार घेतला जात आहे. तेथे इंग्रजी आणि मराठीत पत्रके दिली जात आहेत. गुरुद्वारामधील कार्यक्रमाना उपस्थिती लावली जात आहे.
पत्रकासह विविध भाषांतील सीडीही तयार केल्या आहेत. वॉर्डात फिरणाऱ्या रिक्षामध्ये या सीडीतून मतांचा जोगावा मागितला
जात आहे. बहारदार आवाज आणि संगीताचा आधार घेत या कर्णमधुर सीडी तयार केल्या आहेत. सकाळपासून रात्री दहा वाजेपर्यत या रिक्षा वॉर्डात फिरत आहेत. रहिवाशांची भाषा लक्षात घेऊन त्या भाषेतील पत्रके वाटली जातात. ही बाब लक्षात घेऊन प्रचारप्रमुख पदयात्रेचे नियोजन करीत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Different languages ​​for votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.