विधानसभा निवडणुकांना घाबरून कोरोना पळाला का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:10 IST2021-03-27T04:10:39+5:302021-03-27T04:10:39+5:30
पाचही राज्यांत चाचण्या कमी, रुग्णही कमी : महाराष्ट्र रुग्णसंख्येत देशात अववल प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी ...

विधानसभा निवडणुकांना घाबरून कोरोना पळाला का?
पाचही राज्यांत चाचण्या कमी, रुग्णही कमी : महाराष्ट्र रुग्णसंख्येत देशात अववल
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये, म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत. दुसरीकडे, पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात हजारो नागरिकांची विनामास्क गर्दी होत आहे. निवडणुकांना घाबरून ठराविक राज्यांमधील कोरोना घाबरून पळून गेला का, असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.
पश्चिम बंगाल, तमिळनाडूसह ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक प्रचारसभांना वेग आला आहे. यावेळी हजारोंची विनामास्क गर्दी होत आहे. ‘कोरोना अनुरूप वागणूक’ या राज्यांमध्ये सक्तीची नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत तिथे कोरोना रुग्ण वाढल्याची बातमी नाही. महाराष्ट्रात होणाऱ्या चाचण्या इतर राज्यांच्या तुलनेत कितीतरी पटींनी अधिक आहेत. त्या तुलनेत दररोजच्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या, मृत्यूदरही देशात सर्वाधिक आहे. इतर राज्यांमध्ये मास्कचा कमी वापर, सार्वजनिक ठिकाणी शारीरिक अंतराचा फज्जा अशी स्थिती असतानाही केवळ महाराष्ट्रातच कोरोना वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे.
२५ मार्चच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात एका दिवशी ३५९५२ कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली. त्या तुलनेत पश्चिम बंगालमध्ये ४६२, केरळमध्ये ४१, आसाममध्ये केवळ ४० रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्राचा मृत्युदर २.०९ टक्के, पश्चिम बंगालमध्ये १.७७ टक्के, तमिळनाडूमध्ये १.४५ टक्के तर आसाममधील मृत्युदर ०.५१ टक्के इतका नोंदवला गेला आहे. महाराष्ट्रात दर २५ मार्च रोजी १,२०,०० चाचण्या झाल्या. बंगालमध्ये याच दिवशी ५६,७४०, तमिळनाडूमध्ये ८०,६३४, तर आसाममध्ये १५,७५६ इतक्या चाचण्या झाल्या.
महाराष्ट्र पहिल्यापासूनच कोरोनाचा हॉटस्पॉट ठरले आहे. दुसऱ्या लाटेचाही सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. सर्व राज्यांमधील लोकसंख्या, हवामान, विषाणूच्या प्रसाराचा वेग, चाचण्यांची संख्या, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग या सर्व निकषांचा बारकाईने अभ्यास होण्याची गरज वैद्यकतज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
--------
राज्य चाचण्या एकूण रुग्ण मृत्यू
महाराष्ट्र १८७७६६०३ २५६४८८१ ५३६८४
बंगाल ९०१५०७१ ५८१८६५ १०३१२
तमिळनाडू १९०११११८ ८७१४४० १२६३०
आसाम ७१७००३० २१८०९९ ११०३