पुणे : महापालिकेच्या सोनवणे रुग्णालयात नव्याने सुरू केलेल्या कै. शांताबाई आनंदराव बागवे डायलिसिस सेंटरचे उद्घाटन पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी नगरसेवक अविनाश बागवे, अजित दरेकर, आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती, सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजय वावरे, तसेच रुबी हॉल क्लिनिकचे सर्जन डॉ. आनंद काटकर, सोनावणे हॉस्पिटल प्रमुख डॉ. रोकडे उपस्थित होते. अगरवाल म्हणाल्या, सोनावणे हॉस्पिटल हे पालिकेचे एकमेव प्रसूतिगृह कोरोनाकाळात सुरु होते. या हॉस्पिटलमधील सर्व सेवकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचे काम केले. या हॉस्पिटलसाठी पुढील काळात जी आर्थिक मदत लागेल ती दिली जाईल, असे अगरवाल म्हणाल्या.
नगरसेवक बागवे म्हणाले, सोनावणे हॉस्पिटलमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. यापुढील काळातही गोरगरीब कष्टकरी बहुजन समाजातील नागरिकांना या हॉस्पिटलमधून अत्यंत चांगल्या प्रकारच्या सोयी-सुविधा दिल्या जातील. प्रास्ताविक विठ्ठलराव थोरात यांनी केले. कार्यक्रमासाठी साबीर शेख, रवी पाटोळे, मीरा शिंदे, सुनील घाडगे, सुमित डांगी, क्लेमेंट लाजरस आदी उपस्थित होते.