बारामतीत शरद पवार यांच्या 'गोविंदबाग' समोर धनगर समाजाचे 'ढोल बजाव' आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2020 18:44 IST2020-09-25T18:43:25+5:302020-09-25T18:44:21+5:30
शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारमधील महत्वाचे नेते असल्यामुळे पवार यांनी आरक्षणप्रश्नी लक्ष घालून तोडगा काढावा..

बारामतीत शरद पवार यांच्या 'गोविंदबाग' समोर धनगर समाजाचे 'ढोल बजाव' आंदोलन
बारामती : गेल्या अनेक वर्षांपासून धनगर आरक्षणाचा प्रश्न कायम आहे.या समाजाने देखील हा प्रश्न वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकार समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र तरीदेखील पदरी फक्त आश्वासने आणि निराशाच आली आहे. त्यामुळे धनगर समाज अस्वस्थ असून हे आंदोलन करण्यात येत आहेत. सरकारने धनगर समाजाच्या भावनांचा आदर करून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा यांसह विविध मागण्यांसाठी 'ढोल बजाव' आंदोलन करण्यात आले.
बारामती तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या माळेगाव येथील गोविंदबाग या निवासस्थानासमोर शुक्रवारी (दि.२५ सप्टें) 'ढोल बजाव' आंदोलन करण्यात आले.
फडणवीस सरकारने धनगर समाजासाठी मंजूर केलेले १००० कोटी रुपये धनगर समाजाच्या विकासासाठी खर्च करावेत,समाजाला ST प्रवर्गात समाविष्ट करून ST प्रवर्गाला लागू असणाऱ्या सर्व सुविधा धनगर समाजाला लागू कराव्यात व धनगर समाजाचा आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. याचबरोबर महाराष्ट्रभर मेंढपाळांवर हल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मेंढपाळांवर होणारे हल्ले कमी करण्यासाठी सरकारने घटनात्मक बदल करून कायदा लागू करावा व मेंढपाळांना संरक्षण द्यावे. आदी मागण्यांसाठी हे ढोल बजाव आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजप बारामती तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे,जगदीश कोळेकर, गोविंद देवकाते, सुधाकर पांढरे,अजित मासाळ,भारत देवकाते,गणेश कचरे,समीर झारगड ,गणेश कोकरे ,नितीन शेळके आदी समाजबांधव उपस्थित होते.
.................
शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारमधील महत्वाचे नेते असल्यामुळे पवार यांनी आरक्षण प्रश्नी लक्ष घालून तोडगा काढावा, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल.
-पांडुरंग कचरे,भाजप बारामती तालुकाध्यक्ष