‘कामायनी’च्या देवेंद्रने पटकावले अमेरिकेत पदक
By Admin | Updated: August 17, 2015 02:33 IST2015-08-17T02:33:53+5:302015-08-17T02:33:53+5:30
देवेंद्र हा लहानपणापासून मतिमंद होता. वडील हयात नव्हते. तरीही आईने खचून न जाता धुण्या-भांड्यांची घरकामे करून देवेंद्रसह तीन मुलांना वाढविण्यासाठी कष्ट उपसले

‘कामायनी’च्या देवेंद्रने पटकावले अमेरिकेत पदक
हणमंत पाटील, पुणे
देवेंद्र हा लहानपणापासून मतिमंद होता. वडील हयात नव्हते. तरीही आईने खचून न जाता धुण्या-भांड्यांची घरकामे करून देवेंद्रसह तीन मुलांना वाढविण्यासाठी कष्ट उपसले. याच देवेंद्रने अमेरिकेतील लॉस एंजलिस येथे नुकत्याच झालेल्या विशेष आॅलिम्पिक स्पर्धेत स्केटिंगमध्ये रौप्य व कांस्यपदक पटकावून आईच्या कष्टाचे चीज केले.
गोखलेनगर येथील विशेष मतिमंद मुलांच्या कामायनी संस्थेत देवेंद्र सुनील डेंगळे (वय २२) शिकत आहे. विशेष मुलांमध्ये त्यांची गणना होत असली, तरी कोणतेही काम तो एकग्रतेने व जिद्दीने करतो. या गुणाची पारख शिक्षकांनी केली. त्याला वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन दिले. स्केटिंगची त्याला विशेष आवड होती. त्यामुळे कामायनीचे क्रीडाशिक्षक दैवत लिमन यांनी देवेंद्रला स्केटिंगसाठी प्रोत्साहन दिले. मात्र, देवेंद्र विशेष मुलगा असल्याने त्याला स्केटिंगसारखा साहसी क्रीडा प्रकार जमेल का,
अशी शंका व चिंता त्याच्या कुटुंबीयांना होती.
देवेंद्रचे वडील तो लहान असताना वारले. मात्र, एकत्र कुटुंब असल्याने त्यांचे चुलते सुधीर डेंगळे यांनी त्याची जबाबदारी घेतली. सुधीर हे पुणे महापालिकेत शिपाई म्हणून कार्यरत आहेत. शिक्षक व कुटुंबीयांच्या प्रोत्साहनामुळे गेल्या वर्षभरात देवेंद्रची निवड चेन्नई, हैदराबाद व उत्तर प्रदेश येथील क्रीडा शिबिरामध्ये झाली. त्या ठिकाणी स्केटिंगसाठी त्याला प्रशिक्षण
देण्यात आले.
घरची हलाखीची परिस्थिती असल्याने आहारासाठी विशेष लक्ष द्यावे लागत आहे. देवेंद्रला चांगल्या कंपनीत नोकरी मिळाल्यास
त्याचा आर्थिक प्रश्न सुटेल, असे कामायनीचे क्रीडाशिक्षक दैवत लिमन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.