देवेंद्रला मिळाला आर्थिक आधार
By Admin | Updated: September 1, 2015 04:13 IST2015-09-01T04:13:49+5:302015-09-01T04:13:49+5:30
अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये झालेल्या विशेष आॅलिंपिक स्पर्धेत ‘कामायनी’ संस्थेतील देवेंद्र डेंगळे या मतिमंद विद्यार्थ्याने रौप्य व कांस्यपदक पटकावले.

देवेंद्रला मिळाला आर्थिक आधार
पुणे : अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये झालेल्या विशेष आॅलिंपिक स्पर्धेत ‘कामायनी’ संस्थेतील देवेंद्र डेंगळे या मतिमंद विद्यार्थ्याने रौप्य व कांस्यपदक पटकावले. देवेंद्रच्या कौटुंबिक हलाखीच्या परिस्थितीविषयी ‘लोकमत’ने वाचा फोडली. या वृत्ताची दखल घेत बा. ग. पवार प्रतिष्ठानतर्फे देवेंद्रला १२,००० रुपयांची मदत नुकतीच देण्यात आली.
लॉस एंजेलिसमध्ये २ आॅगस्टला झालेल्या विशेष आॅलिंपिक स्पर्धेत देवेंद्रने अभूतपूर्व यश मिळविले. त्यामुळे पुण्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकले आहे. यापूर्वी चेन्नई, हैदराबाद व उत्तर प्रदेश येथील क्रीडा स्पर्धेत यश मिळविले होते. आणखी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळण्याचे त्याचे स्वप्न आहे. परंतु, घरची परिस्थिती हलाखीची आहे. देवेंद्र लहान असताना वडील वारले. शारीरिक अपंगत्व व कौटुंबिक हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत ‘देवेंद्रने पटकावले अमेरिकेत पदक’ असे वृत्त ‘लोकमत’मध्ये १७ आॅगस्टला प्रसिद्ध झाले. त्याची दखल बा. ग. पवार प्रतिष्ठानने घेतली आहे.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी देवेंद्रला आर्थिक मदतीचा १२,००० रुपयांचा धनादेश सोमवारी सुपूर्द केला. या प्रसंगी शारदा अलायन्सचे प्रमुख विलास यादव, कामायनी संस्थेचे व्यवस्थापक कालिदास सुपाते, प्रभारी प्राचार्य अशोक कुलकर्र्णी, देवेंद्रची आई मंदा डेंगळे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप भोसले आदी उपस्थित होते. देवेंद्रला मदत दिल्याबद्दल कामायनी संस्थेचे सुपाते व कुलकर्र्णी यांनी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.