निर्बंध उठले, तरी बस, रेल्वेमध्ये नाहीत प्रवासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:12 IST2021-06-09T04:12:44+5:302021-06-09T04:12:44+5:30
सोमवारी १७८ गाड्यात केवळ ४ हजार प्रवासी लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: सोमवारपासून राज्यात अनलॉक सुरू झाला. एसटीवरील निर्बंध ...

निर्बंध उठले, तरी बस, रेल्वेमध्ये नाहीत प्रवासी
सोमवारी १७८ गाड्यात केवळ ४ हजार प्रवासी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: सोमवारपासून राज्यात अनलॉक सुरू झाला. एसटीवरील निर्बंध काही अंशी शिथिल करण्यात आले. सर्वसामान्य प्रवाशांना एसटी उपलब्ध झाली असली, तरीही प्रवासी अद्यापही घरातच राहणे पसंत करीत आहेत. एसटी व रेल्वे या रिकाम्याच धावत आहेत. एसटीत पन्नास टक्के प्रवासी क्षमतेस परवानगी आहे. मात्र, प्रवासी संख्या कमी असल्याने गाडीत केवळ १० ते १२ टक्केच प्रवासी आहेत. रेल्वेसेवेबाबत फारसे निर्बंध नव्हते, तरी रेल्वे रिकाम्या धावत आहेत.
गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून थांबलेल्या एसटीचे चाके सोमवारपासून पुन्हा धावायला सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने पुणे एसटी विभागाने सर्व गाडयाची सज्जता पूर्ण ठेवली. सर्व मार्गावर गाड्या सोडण्यात आल्या. मात्र प्रवाशांनी पाठ फिरवली. सोमवारी पुणे विभागाच्या केवळ १७८ एसटी गाड्या धावल्या. यातून केवळ चार हजार प्रवाशांची वाहतूक झाली. प्रवाशांच्या प्रतिसादावर गाड्यांची संख्या अवलंबून असल्याने पहिल्या दिवशी मर्यादित स्वरूपात गाड्या सोडण्यात आल्या. जसा प्रतिसाद वाढेल, त्या प्रमाणात गाड्याच्या संख्येत वाढ होईल.
रेल्वे स्थानक
पुणे रेल्वे स्थानकावरून उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्याना काही प्रमाणात गर्दी आहे. मात्र, मुंबई व दक्षिण भारतात जाणाऱ्या गाड्यांना तुलनेने गर्दी कमी आहे. कमी प्रतिसादामुळे रेल्वे प्रशासनाने मुंबईला जोडणाऱ्या इंटरसिटी दर्जाच्या रेल्वे रद्द केल्या आहेत.
बॉक्स 1
रोजच्या एसटी फेऱ्या
पुणे विभागात १ हजार एसटी असून त्यातून सर्व मार्गावर मिळून ३ हजार फेऱ्या होतात. यातून रोज सरसरी दीड लाख प्रवासी प्रवास करतात. सोमवारी मात्र केवळ १७८ गाडीतून जवळपास ४ हजार प्रवाशांनी प्रवास केला.
बॉक्स 2
पुणे रेल्वे स्थानकावरून रोज साधारणपणे २१८ रेल्वे देशाच्या विविध भागासाठी धावतात. सध्या केवळ ४० रेल्वे धावत आहेत. दिवसभरात पुणे स्थानकावर जवळपास दीड लाख प्रवासी येतात आणि जातात. सध्या या संख्येत घट झाली आहे. सध्या ३८ ते ४० हजार प्रवासी प्रवास करीत आहे.
कोट
एसटी सेवा सुरू होण्याचा सोमवार हा पहिलाच दिवस होता. त्यामुळे प्रतिसाद कमी मिळाला. प्रवाशांना महिती मिळाल्यावर निश्चितच प्रवासी संख्येत वाढ होईल.
- ज्ञानेश्वर रणवरे, विभागीय वाहतूक अधिकारी, पुणे एसटी विभाग