सांस्कृतिक नगरी असूनही सभागृहांचीच वानवा
By Admin | Updated: January 7, 2015 00:57 IST2015-01-07T00:57:17+5:302015-01-07T00:57:17+5:30
सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुण्यात सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृहेच मिळेनाशी झाली आहेत. त्यामुळे अनेक कार्यक्रम रखडले आहेत.

सांस्कृतिक नगरी असूनही सभागृहांचीच वानवा
पुणे : सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुण्यात सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृहेच मिळेनाशी झाली आहेत. त्यामुळे अनेक कार्यक्रम रखडले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून कोथरूड परिसरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह दुरुस्तीसाठी बंद आहे. पुढील दोन-तीन महिने ते बंदच राहणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील नाट्यगृहांचा आढावा घेतला असता, पुण्यात कार्यक्रमांसाठी तारखाच मिळणे अवघड झाले आहे. पुण्यात बालगंधर्व टिळक स्मारक मंदिर, भरत नाट्य मंदिर ही प्रमुख नाट्यगृहे आहेत. सहकारनगर येथे नुकतेच अण्णाभाऊ साठे सभागृह सुरू झाले आहे.
याशिवाय बालशिक्षण संस्थेचे सभागृह, एस. एम. जोशी हॉल, पं. भीमसेन जोशी नाट्यगृह, मॉडर्न महाविद्यालय, गरवारे महाविद्यालय यांची सभागृहे आहेत. मात्र, या सभागृहांच्या तारखा बहुतांश वेळा आरक्षित झालेल्या असतात. त्यामुळे एखाद्या संस्थेने व्यावसायिक स्तरावर कार्यक्रम घेण्याचे ठरविले, तर नाट्यगृहच मिळत नाही. त्यातही सर्वाधिक पसंती ही बालगंधर्व नाट्यगृहालाच असते.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे खजिनदार सुनील महाजन म्हणाले, ‘‘शहराची गरज पाहता, नाट्यगृहांची संख्या कमी आहे. महापालिकेच्या वतीने घोले रस्त्यावर कलादालन किंवा औंध येथे भीमसेन जोशी कलादालन उभारण्यात आले आहे. मात्र, त्यांची क्षमता कमी आहे. त्यामुळे तिकिटे लावून कार्यक्रम करणे याठिकाणी परवडत नाही. फार तर नाटकांच्या तालमी किंवा नृत्य, एकपात्री कार्यक्रमांसाठी या नाट्यगृहांचा उपयोग होतो.’’
नाटकांच्या तालमीनांही शहरात सोयीच्या जागा फारच कमी
आहेत. पुण्यात दररोज पुस्तक प्रकाशनाचे कार्यक्रमही होत असतात. अनेकांची गरज ही छोट्या सभागृहांची असते. त्या प्रमाणात सभागृहे उपलब्ध नाहीत.
याबाबत नाट्य व्यावसायिक मोहन कुलकर्णी म्हणाले, ‘‘गेल्या काही वर्षांमध्ये पुणे
शहरातील उपनगरांमध्ये नाट्यगृहांची संख्या वाढली आहे़ मात्र,
त्याचा पुरेपूर वापर होताना दिसत नाही़ त्याचबरोबर उपनगरांमध्ये अजूनही नाट्यसंस्कृती रुजली नसल्याने, त्याचा सर्व भार बालगंधर्व रंगमंदिर आणि कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहावर येतो़ उपनगरांमधील नाट्यगृहे नवीन असली, तरी त्यांच्या देखभालीकडे आतापासूनच लक्ष देऊन तेथील सोयी-सुविधांचा चांगला वापर झाला, तर उपनगरांमधील या नाट्यगृहांकडे प्रेक्षक वळतील़ (प्रतिनिधी)
४पुणे महापालिकेतर्फे वानवडी येथे महात्मा फुले सभागृह, येरवडा वानवडी येथे सावित्रीबाई फुले सभागृहाचे काम सुरू आहे.
४त्याचबरोबर येरवडा येथेही सभागृह बांधण्याचे नियोजन आहे.
४मात्र, याठिकाणी पुरेशी व्यवस्था केलेली दिसत नाही.
४नाट्यसंस्था किंवा मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन करणारे अजूनही शहरातील मध्यवर्ती भागालाच पसंती देतात.