मंत्र्यांनी आश्वासन देऊनही ज्येष्ठ कलाकार मानधनाच्या ‘प्रतीक्षेतच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:10 IST2021-04-05T04:10:58+5:302021-04-05T04:10:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील ज्येष्ठ कलाकारांच्या खात्यात जानेवारी ते मार्च अखेरचे मानधन जमा होईल, असे राज्याच्या ...

Despite the assurance of the minister, the veteran artist is 'waiting' for the honorarium | मंत्र्यांनी आश्वासन देऊनही ज्येष्ठ कलाकार मानधनाच्या ‘प्रतीक्षेतच’

मंत्र्यांनी आश्वासन देऊनही ज्येष्ठ कलाकार मानधनाच्या ‘प्रतीक्षेतच’

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यातील ज्येष्ठ कलाकारांच्या खात्यात जानेवारी ते मार्च अखेरचे मानधन जमा होईल, असे राज्याच्या सांस्कृतिक मंत्र्यांनी दिलेले आश्वासन हवेतच विरले आहे. एप्रिल महिना उजाडला तरी अजूनही ज्येष्ठ कलाकारांच्या खात्यात मानधन जमा झाले नसल्यामुळे आता अजून किती हक्काच्या पैशासाठी भीक मागायला लावणार? असा संतप्त सवाल ज्येष्ठ कलाकारांनी केला आहे.

शासनातर्फे राज्यातील ज्येष्ठ कलाकारांना दर महिना मानधन दिले जाते. परंतु, त्यांना जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांचे मानधन मिळालेले नाही. हे हक्काचे मानधन देखील कलाकारांना वेळेत मिळणे दुरापास्त झाले आहे. आधीचे तुटपुंजे मानधन आणि ते देखील कलावंतांना वेळेवर मिळत नाही. मग सांगा जगायचं कसं? ही अवस्था झाली आहे, ज्येष्ठ कलाकारांची. या कलाकारांनी आयुष्यभर रंगभूमीची सेवा केली. कोणतीही अपेक्षा न ठेवता रसिकांचे मनोरंजन केले. परंतु, वयाच्या उतरत्या काळात गाठीशी पैसा नसल्याने या कलाकारांना शासनाच्या मानधनावर जगण्याची वेळ आली आहे. दर महिना कलाकारांच्या खात्यात मानधन जमा होणे अपेक्षित असतानाही तीन ते चार महिन्यांमधून एकदाच जमा केले जात आहे. ते देखील मिळेल याची खात्री नसते. त्यामुळे कलाकारांचे मोठ्या प्रमाणावर हाल सुरू आहेत. औषधालादेखील कलाकारांकडे पैसे नाहीत. लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही. ज्येष्ठांना कामेही मिळत नाहीत, आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत बंद झाला आहे. या मानधनावरच आमचा काहीसा उदरनिर्वाह सुरू आहे...पण ते देखील हातात वेळेवर मिळत नाहीत. आम्हाला स्वत:च्याच हक्काच्या मानधनासाठी अजून किती अगतिक व्हायला लावणार? अशी उद्विग्न भावना कलावंतांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांचे मानधन अदा करण्यात येत आहे. यासाठी १८ कोटी रुपयांची तरतूद केलेली असून,वारसदार व नव्याने अंतर्भूत झालेल्या काही कलावंतांनाही मानधन अदा होईल. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कलाकारांच्या पाठीशी सांस्कृतिक कार्य विभाग नेहमीच राहील असे सांगितले होते. मात्र हे केवळ आश्वासनच राहिले असून, मानधनासाठी अजूनही ज्येष्ठ कलाकार प्रतीक्षेतच आहेत.यासंदर्भात राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या एका अधिकाऱ्याशी संपर्क केला असता, ‘मी पाहातो’ असे उत्तर देण्यात आले आहे.

----

चार महिन्यांचे मानधन एकदम द्या

पुण्याबरोबरच राज्यातील ज्येष्ठ कलाकारांची स्थिती अत्यंत वार्ईट आहे. कृपया त्यांच्याकडे लक्ष द्या. त्यांना असं वाऱ्यावर सोडू नका. अवघ्या जगावर कोरोनाचे संकट आहे. सर्वजण त्यामध्ये भरडले जात आहेत. आम्ही जास्तीचे काही मागत नाही. केवळ आमच्या हक्काचे मानधन द्या, एवढंच आमचं म्हणणे आहे. मानधन देतो असे सांगून कलाकारांची चेष्टा करून नका. कला आणि कलाकार वाचवा. राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी आता जानेवारी ते एप्रिल असे चार महिन्यांचे मानधन आम्हाला एकदम द्यावे. ज्यायोगे कलाकारांच्या हाताशी काहीतरी पैसा राहील.

- रजनी भट, ज्येष्ठ अभिनेत्री

Web Title: Despite the assurance of the minister, the veteran artist is 'waiting' for the honorarium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.