केंद्राकडून लस मागवणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामतीतच संपला लसीचा साठा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 06:12 PM2021-03-13T18:12:44+5:302021-03-13T19:12:03+5:30

लसीकरण मोहिम प्रगतीपथावर असताना अचानक संपली लस. अनेकांवर लसीकरणासाठी येऊन माघारी जायची आली वेळ.

Deputy Chief Minister Ajit Pawar's request for vaccine from the Center ended in Baramati | केंद्राकडून लस मागवणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामतीतच संपला लसीचा साठा

केंद्राकडून लस मागवणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामतीतच संपला लसीचा साठा

googlenewsNext
ठळक मुद्देवाढत्या कोराना रुग्णांच्या संख्येने बारामती शहर आणि तालुका चिंतेत


एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार सरसकट लसीकरण करता यावा म्हणून केंद्राकडे मागणी करण्याची चर्चा करत आहेत. पण त्याच वेळी बारामती मध्ये मात्र लसीकरण ठप्प झालंय. लस संपल्याचे सांगत बारामती मधल्या अनेक नागरिकांना आज लसीकरण केंद्रावरून परत पाठवण्यात आले आहे. 
.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती शहरात कोरोना लसीचा शासकीय साठा संपल्याचे समोर आले आहे. याबाबत अनाभिज्ञ असलेले अनेक नागरिक शनिवारी लसीकरणासाठी बारामतीच्या महिला रुग्णालयात गेले होते. त्यांना लस संपल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अनेक लसीकरण ना करताच परत फिरण्याची वेळ त्यांच्यावर आली. 

बारामती शहरातील एमआयडीसीतील महिला रुग्णालयात कोरोना योद्धांसह नावनोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंटलाईन कामगार यांचे मोफत लसीकरण १६ जानेवारीपासून  सुरु आहे. तर १ मार्च पासून ज्येष्ठांना लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरण मोहिम प्रगतीपथावर असताना आज लस संपल्याचे अचानक सांगण्यात आले. बारामतीत रुग्णसंख्या वाढत आहे. त्यातच  भर उन्हात लसीकरणासाठी गेलेल्या नागरीकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, लस संपली असून सायंकाळपर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. पण लसीकरण मोहीम प्रगतीपथावर असताना लसीचा साठा संपला कसाकाय असा सवाल उपस्थित होत आहे. 

दरम्यान, बारामती शहर आणि तालुक्यात कोरोनाची आकडेवारी वाढतच आहे. गेल्या तीन महिन्यापुर्वी कोरोनाचा येथील आलेख घसरला होता. बारामतीकरांनी कोरोनावर नियंत्रण मिळविल्याचे चित्र होते.मात्र, आता चित्र बदलले आहे. १ ते १२ मार्च दरम्यान बारामतीत ६८२ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. फेब्रुवारी मध्ये १० ते १५ रुग्णांवर घुटमळणारी कोरोना रुग्णांची संख्या आता सरासरी प्रतिदिन ६० रुग्णांवर गेली आहे. गेल्या १२ दिवसांत ९ मार्च रोजी सर्वाधिक ८० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. दिवसेंदिवस वाढत्या कोराना रुग्णांच्या संख्येने बारामती शहर आणि तालुक्यात चिंता वाढत आहे. आता कोरोनाचा आलेख वाढतच आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सावध होण्याची, दक्षता घेण्याची गरज आहे.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी आज गेल्या २४ तासातील  कोरोना रुग्णांची आकडेवारी जाहीर केली. यामध्ये बारामती शहरातील ४५ आणि ग्रामीणतधील २३ रुग्णांचा समावेश आहे. अडीच महिन्यात प्रथमच आज  ६८ उच्चांकी रुग्णसंख्या वाढल्याने नागरिकांबरोबरच प्रशासन देखील धास्तावले आहे. बारामतीची आजपर्यंतची रुग्णांची संख्या ७४७३ वर पोहोचली आहे. तर ६७५१ रुग्ण आजपर्यंत बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आजपर्यंत एकूण १४८ जणांचा मृत्यू झाल्याचे डॉ. खोमणे यांनी सांगितले.

Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar's request for vaccine from the Center ended in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.