संत चांगावटेश्वर पादुकांचे पंढरीकडे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:09 IST2021-07-20T04:09:53+5:302021-07-20T04:09:53+5:30

या अभंगाच्या ओवी म्हणत, टाळमृदंगाचा गजर करीत, डोक्यावर तुळशी वृंदावन, खांद्यावर भगव्या पताका घेऊन विठोबा रुखमाई आणि ज्ञानोबा, तुकारामच्या ...

Departure of Saint Changavateshwar Padukone towards Pandhari | संत चांगावटेश्वर पादुकांचे पंढरीकडे प्रस्थान

संत चांगावटेश्वर पादुकांचे पंढरीकडे प्रस्थान

या अभंगाच्या ओवी म्हणत, टाळमृदंगाचा गजर करीत, डोक्यावर तुळशी वृंदावन, खांद्यावर भगव्या पताका घेऊन विठोबा रुखमाई आणि ज्ञानोबा, तुकारामच्या नावाचा जयघोष करीत मोठ्या उत्साहात पावसाच्या सरी अंगावर झेलत संत चांगावटेश्वर महाराजांचा पालखी सोहळा क्षेत्र पंढरपूरकडे आषाढी यात्रेसाठी मार्गस्थ झाला आणि उपस्थित भाविकांनी फुलांची उधळण करीत भक्तिभावाने निरोप दिला.

सासवड (ता. पुरंदर) येथून सोमवारी (दि. १९) संत चांगावटेश्वर पादुका प्रस्थान सोहळा सुरु झाला. पहाटे ४.३० वाजता काकड आरती घेण्यात आली. त्यानंतर श्री चांगावटेश्वर समाधी आणि पादुकांना पांचाळ अभिषेक घालण्यात आला. तसेच वीणापूजन झाल्यानंतर सामूहिक महाआरती घेण्यात आली. संत सोपानदेव महाराज यांच्या पादुका प्रस्थान सोहळा पूर्ण झाल्यानंतर काही वेळातच संत चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील सहभागी असणाऱ्या दिंडीप्रमुखांचा तसेच दिंडीचालक, विणेकरी, मृदंगमणी, पताका घेणारे, चोपदार, तुळशी वृंदावन घेणाऱ्या महिला वारकरी या सर्वांचा देवस्थानच्या वतीने श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

संत चांगावटेश्वर महाराज यांच्या पादुका डोक्यावर घेऊन टाळमृदंगाचा गजर करीत शासनाच्या शिवशाही बसमध्ये विराजमान करण्यात आल्या. यावेळी पुरंदरचे आमदार संजय जगताप, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रुपाली सरनोबत, नायब तहसीलदार सूर्यकांत पठाडे, गटविकास अधिकारी अमर माने, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, एसटी डेपो मॅनेजर मनीषा इनामके, पालखी सोहळ्याचे अध्यक्ष जनार्धन वाबळे, विश्वस्त हरिभाऊ शिंदे, चोपदार शशिकांत जगताप, बाळासाहेब आबा कामथे, मृदंगवादक शरद जगताप, त्याच प्रमाणे छत्रीधारी, मानकरी आदी उपस्थित होते.

चौकट

संत सोपानदेव महाराज आणि संत चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळ्यात प्रत्येकी ४ याप्रमाणे चार बसमधून ८० व्यक्ती पंढरपूरकडे मार्गस्थ झाले आहेत. सोपानदेव सोहळ्यासोबत प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड तर चांगावटेश्वर सोहळ्याबरोबर नायब तहसीलदार सूर्यकांत पठाडे राहणार आहेत. २४ रोजी दोन्ही पादुकांचे सासवडमध्ये आगमन होणार असल्याचे पालखी सोहळाप्रमुखांचे वतीने सांगण्यात आले.

फोटो : संत चांगावटेश्वर यांच्या पादुका मान्यवरांच्या उपस्थितीत शिवशाही बसने पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या.

Web Title: Departure of Saint Changavateshwar Padukone towards Pandhari