रावेत परिसरात डेंगीचे रुग्ण
By Admin | Updated: July 2, 2014 02:02 IST2014-07-02T02:02:42+5:302014-07-02T02:02:42+5:30
वाल्हेकरवाडी परिसरातील भोंडवेनगर येथील एकवीरा कॉलनीमध्ये डेंगीचा रुग्ण आढळल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

रावेत परिसरात डेंगीचे रुग्ण
रावेत : वाल्हेकरवाडी परिसरातील भोंडवेनगर येथील एकवीरा कॉलनीमध्ये डेंगीचा रुग्ण आढळल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिसरात पालिकेचा सुसज्ज दवाखाना नसल्यामुळे रुग्णाला चिंचवड येथील खासगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागत आहे
पालिकेच्या आरोग्य विभागाकडून परिसरातील विविध सोसायटी, शाळा, महाविद्यालयांमधून डेंगी आणि चिकनगुनिया या आजाराविषयी जनजागृती करण्यात येत आहे. परिसरातून मोठा नाला जात असल्यामुळे या ठिकाणी नेहमी कचऱ्याचे आणि पाण्याचे साम्राज्य असते. त्यामुळे नेहमी दुर्गंधी पसरलेली असते. त्यातच पाणी साचून राहात असल्यामुळे डासांच्या वाढीस पोषक वातावरण मिळते. या नाल्याची आरोग्य विभागाच्या वतीने नियमित स्वच्छता होत नाही. त्याच बरोबर आवश्यक औषध फवारणी वेळेत केली जात नाही, त्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून परिसरात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
घर व परिसर स्वछ ठेवावा. घरासमोरील गटाराचे पाणी वाहते करण्यात यावे व त्यात कचरा टाकू नये. घराच्या आवारातील तसेच गच्चीवरील पाणी साचून राहणाऱ्या निरोपयोगी वस्तू नष्ट कराव्यात. पाणी साठवलेल्या भांड्यावर सतत
झाकण राहील याबाबत काळजी घ्यावी. आठवड्यातून एक
दिवस कोरडा दिवस पाळावा आदी काळजी घेतल्यास डासांपासून होणाऱ्या विविध आजारांवर मात करता येऊ शकते. (वार्ताहर)