माळेगावमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढले; प्रशासन सतर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:14 IST2021-08-12T04:14:13+5:302021-08-12T04:14:13+5:30
माळेगाव : माळेगाव परिसरात डेंग्यूचे रुग्ण वाढीस लागल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. डेंग्यूसह झिंका व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपंचायत ...

माळेगावमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढले; प्रशासन सतर्क
माळेगाव : माळेगाव परिसरात डेंग्यूचे रुग्ण वाढीस लागल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. डेंग्यूसह झिंका व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपंचायत माळेगाव व परिसरात औषधफवारणी करण्यात येत आहे. याबाबत प्रशासक तहसीलदार विजय पाटील यांनी माहिती दिली. ग्रामस्थांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील ७९ गावे झिका व्हायरसबाबत अतिसंवेदनशील असल्याचे जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये बारामती तालुक्यातील सात गावे व शहरातील काही भागांचा समावेश आहे. माळेगाव नगरपंचायत परिसरातदेखील डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणात फैलावली आहे. तसेच परिसराला झिका व्हायरसचा धोका संभवतो.
माळेगावमधील विद्यानगर भागात डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असून अनेक ग्रामस्थ डेंग्यूने त्रस्त आहेत. मोठ्या प्रमाणावर डेंग्यूचे रुग्ण सापडल्याने नगरपंचायत प्रशासनाची झोप उडाली होती. विद्यानगरसह माळेगाव भागात झिकाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून प्रशासन चिंतेत आहे.
झिका व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून विद्यानगर भागात औषधफवारणी करण्यात येत आहे. नगरपंचायतीचे शंकर ठोंबरे, सुरेश सावंत, विकास जाधव, पप्पू भोसले, रणजित जाधव, सेहवाग सोनवणे आदी कर्मचारी औषधाची फवारणी करत आहेत. संपूर्ण नगरपंचायत परिसरात औषधफवारणी करण्यात येणार आहे.
—————————————————
ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये, परिसर स्वच्छ ठेवावा. ताप येणे, अंगदुखी, सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे अशी लक्षणे आढळून आल्यास आरोग्यवर्धिनी केंद्रात संपर्क साधावा.
-नवनाथ शिंदे, आरोग्य सेवक
————————————————————
फोटो ओळी - डेंग्यूसह झिका व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषधफवारणी करण्यात येत आहे.
१००८२०२१-बारामती-०७
————————————————