दिव्यांगांच्या मागण्यांचा विचार केला जाईल : वळसे-पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:14 IST2021-08-23T04:14:28+5:302021-08-23T04:14:28+5:30
मंचर उपजिल्हा रुग्णालय नूतन सुविधा लोकार्पण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी दिव्यांग संघटना आंबेगाव ...

दिव्यांगांच्या मागण्यांचा विचार केला जाईल : वळसे-पाटील
मंचर उपजिल्हा रुग्णालय नूतन सुविधा लोकार्पण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी दिव्यांग संघटना आंबेगाव तालुक्याच्या वतीने दिव्यांग बांधवांनी वळसे पाटील यांची भेट घेतली. उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील दिव्यांग बांधवांना अस्थिव्यंग व अंध या दोन प्रकारचीच दिव्यांग प्रमाणपत्र दिली जातात. परंतु ही सुविधा मतिमंद व पॅरालिसीस असणाऱ्या दिव्यांगांनाही आपल्या तालुक्यातच उपलब्ध व्हावी आणि त्यांनाही या प्रकारची प्रमाणपत्र देण्याची सुविधा आपल्या उपजिल्हा रुग्णालय याठिकाणी सुरू करण्यात यावी यासंबंधी निवेदन देण्यात आले. तीनही तालुक्यांतील पॅरालिसीस आणि मतिमंद रुग्णांची संख्या बरीचशी आहे.अशा पॅरालिसीस व मतिमंद असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ससून याठिकाणी जावे लागते. परिणामी रुग्णांचे खूप हाल होतात. त्यांना उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी ही सुविधा मिळाली तर त्यांचे हाल होणार नाहीत. अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. तसेच तालुकास्तरीय संजय गांधी कमिटीवर दिव्यांग व्यक्तीची नियुक्ती करण्यात यावी. बऱ्याच वर्षापासून दिव्यांग व्यक्तीची नेमणूक केली नसल्याने ही जागा रिक्त आहे. त्यादृष्टीने वरिष्ठ पातळीवर जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन दिव्यांग व्यक्तीची नेमणूक करण्यात यावी. यासंबंधीही वळसे पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदन स्वीकारल्यानंतर उपजिल्हा रुग्णालय मंचर याठिकाणी मतिमंद व पॅरालिसीस दिव्यांग पत्र देणेविषयी आपण विशेष प्रयत्न करणार आहोत. तसेच दिव्यांग व्यक्तीची तालुकास्तरीय संजय गांधी शाखेवर निवड ही लवकरात लवकर केली जाईल व दिव्यांग कल्याण निधी खर्चासंबंधी अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन संबंधित निधी लवकरात लवकर वितरित करण्याच्या सूचनाही देण्यात येतील असे आश्वासन वळसे पाटील यांनी दिले. या वेळी दिव्यांग संघटना आंबेगाव तालुका अध्यक्ष समीर टाव्हरे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, संस्थापक सुनील दरेकर तसेच संजय भैये, पूनम काळे, शोभा पिंगळे, आनिता दरेकर, दीपा गावडे आदी दिव्यांग बांधव उपस्थित होते.