मलघेवाडी रस्त्याच्या कामाच्या चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:12 IST2021-04-01T04:12:03+5:302021-04-01T04:12:03+5:30
मलघेवाडी येथे गेले कित्येक वर्षे गावात जाण्यासाठी चांगला रस्ता नव्हता. यापूर्वी जे डांबरी रस्ते झाले ते व्यवस्थित झाले नाही. ...

मलघेवाडी रस्त्याच्या कामाच्या चौकशीची मागणी
मलघेवाडी येथे गेले कित्येक वर्षे गावात जाण्यासाठी चांगला रस्ता नव्हता. यापूर्वी जे डांबरी रस्ते झाले ते व्यवस्थित झाले नाही. जिल्हा परिषद फंडातून या गावाच्या रस्त्यासाठी ३० लाख रुपये निधी मंजूर झाला होता. यामधून २५० मीटर सिमेंटी रस्ता व २०० मीटर डांबरी रस्ता नुकताच तयार करण्यात आला. नागरिकांची मागणी होती या रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे, काम सुरू असतानाच नागरिकांनी निकृष्ट कामाबाबत तक्रारी केल्या होत्या. अनेक वेळा ठेकेदारांबरोबर ग्रामस्थांची भांडणे झाली. मात्र प्रशासनाने यांची दखल घेतली नाही. रस्त्याचा काही भाग काँक्रिटीकरण करण्यात आला आहे, मात्र त्यावर हवे तेवढे पाणी मारण्यात आले नाही. त्यामुळे रस्ता किती दिवस टिकणार, असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
साईडपट्ट्या व्यवस्थित भरण्यात आल्या नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा रस्ता वर्दळीचा असून या मार्गाने नागरिक यांची नेहमी ये-जा सुरू असते. त्यामुळे संपूर्ण रस्ता मजबूत होणे अत्यावश्यक होते. कामाचा योग्य दर्जा राखला जात नसल्याने लागलीच रस्त्यावरील सिमेंट व डांबर उघडणे, रस्ता खचणे, खड्डे निर्माण होणे असे प्रकार होणार आहेत. रस्त्याच्या पायाचे काम चांगल्या दर्जाचे झाले नसल्याने हा रस्ता पुढे किती दिवस तग धरणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच डांबरीकरण रस्त्याला मातीमिश्रित मुरुम टाकण्यात आला. हवे तसे मजबूत करण्यात आले नाही. डांबरच निकृष्ट दर्जाचे वापरल्यामुळे हा रस्ता किती दिवस टिकणार, अशी शंका निर्माण झाली आहे. रस्त्याच्या कामाची गुणनियंत्रण विभागाकडून चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
३१ दावडी
मलघेवाडी (ता. खेड) येथे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहे.