गुळुंचे येथील उपकेंद्रात कोरोना लस देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:12 IST2021-04-01T04:12:23+5:302021-04-01T04:12:23+5:30
नीरा (ता. पुरंदर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण करण्यासाठी होणारी गर्दी तसेच ज्येष्ठ नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता गुळुंचे ...

गुळुंचे येथील उपकेंद्रात कोरोना लस देण्याची मागणी
नीरा (ता. पुरंदर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण करण्यासाठी होणारी गर्दी तसेच ज्येष्ठ नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता गुळुंचे व परिसरातील वाड्यावस्त्यांसाठी गुळुंचे येथील उपकेंद्रात कोरोना लस देण्याची मागणी नरवीर राजे उमाजी नाईक सामाजिक विकास ट्रस्टच्या वतीने आज करण्यात आली. याबाबतचे निवेदन सचिव ईश्वर गायकवाड यांनी वैद्यकीय अधिकारी तसेच तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.
नीरेतील प्राथमिक आरोग्य केंद्रात उन्हात रांगा लावून ज्येष्ठ नागरिकांना लस घ्यावी लागत होती. तसेच नीरा हे मोठे बाजारपेठेचे तसेच दोन जिल्ह्याचे व चार तालुक्याचे जवळचे ठिकाण असल्याने लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नोंदणी होत असल्याने गर्दी होत आहे. त्यातच अनेक ज्येष्ठांना जुनाट व्याधी असून अनेकांना सांधेदुखीचा आजार आहे. लस घेण्यासाठी कैक किलोमीटरचा प्रवास त्यांना त्रासदायक ठरत असल्याने ट्रस्टच्या वतीने मागणी केल्याचे सहसचिव ऍड. अमोल यादव यांनी सांगितले.
सांसद आदर्श ग्राम योजनेत गुळूंचे येथील आरोग्य उपकेंद्रांची इमारतची डागडुजी करण्यात आली आहे. मात्र, पूर्णवेळ कर्मचारी नसल्याने ही इमारत केवळ दिखावा झाली आहे. रहिवासी वैद्यकीय अधिकारी किंवा कर्मचारी नसल्याने इमारतीची दुरवस्था होत आहे.
प्रसूतीसाठी कक्ष उभारून देखील आवश्यक ती आरोग्य सुविधा व साधने नसल्याने हे उपकेंद्र केवळ लहान मुलांच्या लसीकरण करण्यापूरते मर्यादित राहीले आहे. कोरोना लस देण्यासाठी आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर असून इंटरनेट जोडणी देखील करून घ्यावी लागणार आहे. या निमित्ताने तरी का होईना आरोग्य उपकेंद्र कात टाकेल असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, ट्रस्टच्या या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने लसीकरण उपकेंद्रात सुरू करण्याची शिफारस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी कांचन निगडे, तालुका उपाध्यक्ष अक्षय निगडे तसेच काँग्रेस पक्षाचे गटप्रमुख नितीन निगडे यांनी केली.