देहूरोड-कात्रज बाह्यवळण रस्ता होणार कधी?
By Admin | Updated: August 18, 2015 23:51 IST2015-08-18T23:51:55+5:302015-08-18T23:51:55+5:30
मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील देहूरोड ते कात्रज बाह्यवळण रस्त्याचे सहापदरीकरण, भुयारी मार्गावरील तसेच नदी , ओढे व नाल्यांवरील लहान मोठया

देहूरोड-कात्रज बाह्यवळण रस्ता होणार कधी?
देवराम भेगडे, देहूरोड
मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील देहूरोड ते कात्रज बाह्यवळण रस्त्याचे सहापदरीकरण, भुयारी मार्गावरील तसेच नदी , ओढे व नाल्यांवरील लहान मोठया पुलांची बांधकामे व सेवा रस्त्यांची कामे रखडल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे . धोकादायक रस्त्यावरून असुरक्षितरित्या प्रवास करावा लागत असल्याने वाहनचालक व स्थानिक त्रस्त झाले आहेत. ठेकेदाराकडून विविध कारणे दाखवून कामाची मुदत वारंवार वाढवून घेतली जात आहे. अद्यापही रस्त्याची अर्धवट कामे झाली असताना टोल वसुली मात्र जोमात सुरु असल्याने रस्त्याची सर्व कामे पूर्ण कधी होणार ? असा सवाल वाहनचालक व स्थानिकांतून उपस्थित केला जात आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे देहूरोड येथील पोलिस ठाण्याच्या नजीकचा चौक ते सातारा ( किमी 725 ते किमी 865 ) दरम्यानचे एकूण एकशे चाळीस किलोमीटर रस्त्याचे सहापदरीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग विकास योजना पाचच्या अंतर्गत ‘बांधा , वापरा व हस्तांतर करा’ पद्धतीने व ‘डी बी एफ ओ ’ तत्वानुसार ह्यपी एस टोल रोड प्रायव्हेट लिमिटेड ह्य या खासगी ठेकेदाराकडून करण्यात येत आहे. रस्त्याच्या कामाचे आदेशानुसार एक आॅक्टोबर २०१० रोजी सुरु झाले असून, काम पूर्ण करण्यासाठी तीस मार्च 2013 पर्यंतची मुदत देण्यात आली होती.
देहूरोड येथील पोलिस ठाण्याच्या नजीकचा चौकापासून ते किवळे उड्डाणपुलापर्यंत जकात नाका परिसर वगळून सर्वत्र जागा उपलब्ध असताना अद्यापही सेवा रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. किवळे हद्दीतील विकासनगर येथील पेट्रोल पंप ते किवळे गाव रस्ता इंद्रप्रभा चौक दरम्यान कोणताही अडथळा नसताना सेवा रस्त्याचे काम सुरु झालेले नाही. किवळे पूल ते रावेत पुलादरम्यान सुरुवातीला सेवा रस्ता बनविण्यात आला आहे. मात्र दुरुस्ती देखभाली अभावी दुरवस्था झाली आहे. दुतर्फा मुख्य रस्त्याच्या बाजूपट्टयांची दुरवस्था झाली आहे. रावेत ते वाकड दरम्यान विविध ठिकाणी सेवा रस्त्याची कामे रखडली आहेत . तसेच वाकड ते पुनावळे येथील पवना नदीवरील पुलापर्यंत सेवा रस्त्याची कामे अर्धवट आहेत. रावेत ते किवळे दरम्यान सेवा रस्ता डांबरीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे.
किवळे येथील द्रुतगती महामार्गाजवळ एका पुलाचे सुरूझालेले काम गेल्या महिन्यापासून रखडले आहे. तर दुसऱ्या बाजूचे काम सुरू झालेले नाही.