देहूरोड, विकासनगर परिसरात रोजच्या ‘बत्ती गुल’ने नागरिक हैराण
By Admin | Updated: July 6, 2015 04:51 IST2015-07-06T04:51:20+5:302015-07-06T04:51:20+5:30
देहूरोड, विकासनगर परिसरात गेल्या १५-२० दिवसांपासून दररोज कोणत्याही वेळी वीजपुरवठा बंद ठेवून नागरिकांना अक्षरश: हैराण केले जात आहे.

देहूरोड, विकासनगर परिसरात रोजच्या ‘बत्ती गुल’ने नागरिक हैराण
किवळे : देहूरोड, विकासनगर परिसरात गेल्या १५-२० दिवसांपासून दररोज कोणत्याही वेळी वीजपुरवठा बंद ठेवून नागरिकांना अक्षरश: हैराण केले जात आहे. गेल्या काही दिवसात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने महावितरणच्या कारभाराला विकासनगर व देहूरोड परिसरातील नागरिक कंटाळले असून, एखाद्या दुर्गम भागात तर आपण राहत नाही ना, असे येथील नागरिकांना वाटू लागले आहे.
वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वीजपुरवठा बंद होत असल्याने अनेक बहुमजली इमारतींतील सदनिकांमध्ये पंपाद्वारे पाणी चढविता येत नाही. बहुमजली इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना उद्वाहक (लिफ्ट) बंद पडल्याने चढ-उतार करण्यासाठी खूप त्रास होत आहे. पिठाची गिरणी बंद पडत आहेत.
दोन महिन्यांपूर्वी बोर्डाचे सदस्य विशाल खंडेलवाल यांच्या पुढाकाराने देहूरोड महावितरण कार्यालयावर नागरिक व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून आंदोलन केले होते. त्या वेळी भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता डी. पी. पेठकर यांनी आंदोलकांशी चर्चा करून महिनाभरात देहूरोडसाठी मळवली फीडर लिंक करण्याचे काम करण्यात येणार आहे. वाहिन्यांचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावण्यात येणार आहे. चिंचवड येथून पुरवठा होत असून, पंधरा-वीस दिवसांत देहूरोडला स्वतंत्र पुरवठा देण्याबाबत काम सुरू करण्यात आले आहे, असे लेखी दिले होते. नंतर महिनाभर पुरवठ्यात सुधारणा झाली होती. मात्र गेल्या पंधरा दिवसांत वेळी अवेळी वीजपुरवठा खंडित केला जात असून, चिंचवड येथून वीजपुरवठ्यात व्यत्यय आणला जात असल्याचे सांगितले जात आंदोलनानंतर वीजपुरवठा सुरळीत होत होता. त्यामुळे पुन्हा आंदोलन केल्यावरच पुरवठा सुरळीत होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)