आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जन्मोत्सव आणि संत तुकाराम महाराजांचा ३७५ वा वैकुंठगमन सोहळ्याचे औचित्य साधून तुकाराम महाराजांची पालखी परतीच्या प्रवासात आळंदीत आणावी यासाठी आळंदी देवस्थानाकडून देहू देवस्थानला पत्राद्वारे निमंत्रण देण्यात आले होते. यापार्श्वभूमीवर देहू देवस्थानने आळंदीकरांचे हे निमंत्रण स्वीकारले असून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी येत्या रविवारी (दि. २०) आळंदीत माऊलींच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे तुकोबारायांचा पालखी सोहळा आळंदीत मुक्काम करणार आहे. माउलींची पालखी येत्या रविवारी (दि.२०) आळंदीत दाखल होणार आहे. त्याच दिवशी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आळंदीत यावा असे निमंत्रण देवस्थानाकडून देण्यात आले होते. याबाबतचे पत्र आळंदी देवस्थानचे सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे आणि विश्वस्त चैतन्य महाराज कबीर यांनी देहू देवस्थानचे अध्यक्ष जालिदर महाराज मोरे यांना दिले होते. परंपरेप्रमाणे संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीस जाणे महत्त्वाचे मानले जाईल असे पत्रात नमूद करण्यात आली होते. पूर्वी संत तुकाराम महाराज आळंदीत माउलींचे दर्शन घेऊन पंढरपूरला मार्गस्थ होत असे. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र तपोनिधी नारायण महाराज यांनी पालखी सोहळा सुरू केला. १६८५ पासून देहूमधून संत तुकारामांच्या पादुका पालखीत ठेवून ते आळंदीत येत होते. नंतर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घेत पुढे पंढरपुरला प्रस्थान करत होत्या. त्यानंतर ही परंपरा खंडित झाल्यावर गुरु हैबतबाबा आरफळकर यांनी १८३२ मध्ये स्वतंत्रपणे संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सुरू केला. त्यानंतर दोन्ही संतांच्या पालखीचे मार्ग बदलले. दोन्ही पालखी सोहळ्यात लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होत आहेत. या दोन संतांची भेट होण्यासाठी या वर्षी सोहळा आळंदीला नेण्याची मागणी वारकऱ्यांच्या वतीने आळंदी देवस्थानने देहू देवस्थानला केली होती. दोन्ही देवस्थानच्या विश्वस्तांमध्ये सखोल चर्चा करण्यात आली. देहू देवस्थान येथे निमंत्रण स्वीकारल्याने संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन पालख्यांच्या भेटीचा अनुपम सोहळा येत्या रविवारी हजारो भाविकांना अनुभवता येईल.
टेक्स्ट - तुकोबा १७ वर्षानंतर आळंदीत माऊलींच्या भेटीला येणार...
आळंदी देवस्थान आणि ग्रामस्थांकडून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे जोरदार स्वागत केले जाणार आहे. दरम्यान २८ जुलै २००८ मध्ये तुकाराम महाराजांच्या ४०० व्या जन्मोत्सवावेळी तुकोबांचा पालखी सोहळा आळंदीमध्ये आणण्यात आला होता. तब्ब्ल १७ वर्षानंतर पुन्हा एकदा जगद्गुरु तुकोबाराय आळंदीत येणार आहेत.