देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत पदके कमी
By Admin | Updated: June 24, 2014 00:09 IST2014-06-23T22:44:27+5:302014-06-24T00:09:35+5:30
राज्यातील अनेक मुले-मुली विविध क्रीडाप्रकार आत्मसात करण्याकरिता उत्सुक आहेत. त्यामुळे त्यांना सुविधा द्यायला हव्या.

देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत पदके कमी
अजित पवार : ऑलिम्पिक दिन समारंभ
पुणे : पूर्वीच्या तुलनेत मैदानांची संख्या कमी होऊ लागली आहे. राज्यातील अनेक मुले-मुली विविध क्रीडाप्रकार आत्मसात करण्याकरिता उत्सुक आहेत. त्यामुळे त्यांना सुविधा द्यायला हव्या. आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणार्या खेळाडूंची संख्या कमी असल्याने देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत पदके कमी मिळत आहेत, अशी खंत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनतर्फे ऑलिम्पिक दिनानिमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते. यावेळी असोसिएशनचे महासचिव प्रा. बाळासाहेब लांडगे, बाळकृष्ण अकोलकर, मनोज पिंगळे, बंडा पाटील, निखील कानिटकर, धनराज पिल्ले, गोपाळ देवांग, शांताराम बापू, श्रीरंग इनामदार, रणजित जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमात ऑलिम्पिकपटू, ध्यानचंद व अर्जुन पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यात आला.
पवार म्हणाले, विविध क्रीडाप्रकार शिकून आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये सहभागी होण्याकरिता नव्या पिढीने लक्ष घातले आहे. परंतु मोठ्या प्रमाणात कष्ट करण्याची आवश्यकता आहे. यापूर्वी ऑलिम्पिकमध्ये जगातील आर्थिक महासत्तांचे वर्चस्व होते. परंतु, भारत आर्थिक महासत्ता होण्याकडे वाटचाल करीत आहे. आश्वासक दिशेने पाऊल पडत असल्याने वाव आहे.
सत्काराला उत्तर देताना पिंगळे म्हणाले, क्रीडापटूंना जिल्हा आणि स्थानिक पातळीवरुन योग्य मदत मिळायला हवी. तरच चांगले ऑलिम्पिकपटू तयार होऊ शकतील. ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेण्यास कमी प्रमाणात क्रीडापटू पुढे येत आहेत. ती संख्या वाढविण्याचे प्रयत्न व्हायला हवे.
कार्यक्रमात ९ मिनिटांत २६५ आसने घालून चिमुकल्या क्रीडापटूंनी उपस्थितांना आश्चर्यचकीत केले. तसेच र्िहदमिक जिम्नॅस्टिक आणि शरीर सौष्ठव करणार्यांनी केलेले सादरीकरण आकर्षण ठरले. डॉ. उदय डोंगरे यांच्या क्रीडा पुस्तकाचे प्रकाशन झाले. प्रा. बाळासाहेब लांडगे यांनी प्रास्ताविक केले. दिनेश पांडे यांनी सूत्रसंचालन केले.