भेंडी, फ्लॉवर, शेवगा भावात घट
By Admin | Updated: August 17, 2015 02:51 IST2015-08-17T02:51:03+5:302015-08-17T02:51:03+5:30
श्रावण महिना सुरू झाला असल्याने भाज्यांना मागणी वाढली आहे. घाऊक बाजारात भाज्यांची पुरेशी आवक होत असल्याने बहुतेक फळभाज्यांचे भाव स्थिर राहिले

भेंडी, फ्लॉवर, शेवगा भावात घट
पुणे : श्रावण महिना सुरू झाला असल्याने भाज्यांना मागणी वाढली आहे. घाऊक बाजारात भाज्यांची पुरेशी आवक होत असल्याने बहुतेक फळभाज्यांचे भाव स्थिर राहिले. भेंडी, कारली, फ्लॉवर, शेवगा, घेवड्याच्या भावात घट झाली, तर हिरवी मिरची व वांग्याचे भाव वाढले.
गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी १७० ते १८० ट्रक शेतमालाची आवक झाली. मागील आठवड्याप्रमाणेच ही आवक कायम राहिल्याने फळभाज्यांच्या भावावर फारसा परिणाम झालेला नाही. सध्या श्रावण महिन्यामुळे भाज्यांना मागणी वाढली आहे. पावसाने दडी मारली असली तरी बाजारात भाज्यांची मुबलक आवक अद्याप सुरू आहे. पुणे विभागातील काही भागात अधून-मधून पावसाने हजेरी लावल्याने तसेच पाणी उपलब्ध असलेल्या भागातून भाजीपाला बाजारात येत आहे. रविवारी भेंडी, फ्लॉवर व घेवडा या भाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत प्रति दहा किलोमागे प्रत्येकी सुमारे ८० रुपयांनी, तर कारल्याचे भाव ५० रुपयांनी उतरले. कारल्याच्या भावात ५० रुपयांची, तर शेवग्याच्या भावात १०० रुपयांची घट झाली. हिरवी मिरची, वांगी व कोहळ्याचे भाव प्रत्येकी ५० रुपयांनी वाढले.
पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर, मेथी व शेपूच्या भावात शेकडा जुडीमागे २०० रुपयांची वाढ झाली. इतर भाज्यांचे भाव स्थिर राहिले. बाजारात सुमारे सव्वा लाख जुडी कोथिंबीरची तर ८० हजार जुडी मेथीची आवक झाली.
घाऊक बाजारात परराज्यातून कर्नाटकातून ४ते ५ टेम्पो मटारची तसेच कोबीची दोन ट्रक आवक झाली. शेवग्याची आंध्र प्रदेश, तमिळनाडूतून ७ ते ८ टेम्पो, मध्य प्रदेश, कर्नाटकातून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची तसेच इंदूरहून ७ ते ८ टेम्पो गाजरची आवक झाली आहे. बटाट्याची इंदूर, आग्राहून ६० ट्रक, लसूणची मध्य प्रदेशातून तीन हजार गोणीची आवक झाली.
स्थानिक भागातून सातारी आल्याची ६०० ते ६५० पोती, बंगळुरूहून २०० गोणी, वाई, सातारा, पारनेरहून मटारची दोन टेम्पो, पावट्याची पुणे विभागातून ७ ते ८ टेम्पो, टोमॅटोची साडेसहा हजार पेटींची आवक झाली. फ्लॉवरची पुणे विभागातून १८ ते २० टेम्पो, कोबीची १४ ते १५ टेम्पो, सिमला मिरचीची १० ते १२ टेम्पोची आवक झाली. भुईमूग शेंगाची दीडशे गोणी, तांबडा भोपळ्याची ८ ते १० टेम्पोची आवक झाली.