defeat comes when an MP like Pragya Singh Thakur gets elected | प्रज्ञासिंग ठाकूर सारखी खासदार निवडून येते हाच पराभव 
प्रज्ञासिंग ठाकूर सारखी खासदार निवडून येते हाच पराभव 

पुणे: अब्राहम लिंकनच्या मारेकऱ्याचे पुतळे अमेरिकेत उभारले जात नाही, भारतात नथुरामचे पुतळे उभारले जातात, पुण्यतिथी साजरी केली जाते, प्रज्ञासिंग ठाकूर सारखी खासदार नथुरामचे समर्थन करुन निवडून येते, हा गांधींजींचा नसून भारतीय म्हणून आपल्या सर्वांचा पराभव आहे असे प्रतिपादन खासदार कुमार केतकर यांनी केले. गांधी विचारांचे निर्दालन करणारे सत्तेत जातात,हा गांधीजींचा पराभव नसून भारतीयांचा पराभव आहे, असेही त्यांनी सांगितले. 

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे आयोजित "राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह "चे उद्घाटन खासदार कुमार केतकर यांच्या हस्ते पुण्यात १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झाले. गांधी सप्ताह उपक्रमाचे हे दहावे वर्ष होते.

केतकर म्हणाले, जग अण्वस्त्रसज्ज झाले आहे. नवनवीन आंतरखंडीय क्षेपणास्र तयार  आहेत. आताचे जग ३ मिनिटात नष्ट होऊ शकते,अशी भीती आहे. विध्वंसक आणि भावनारहीत विज्ञान -तंत्रज्ञानाचा विस्तार वाढत आहे. अशा पार्श्वभूमीवर साम्राज्यवाद नव्हे तर द्वेश संपविण्याचा, प्रेम वाढविण्याचा  गांधीजींचा  संदेश महत्वपूर्ण ठरतो.गांधीजी नसते तर आपल्याला इतका मोठा वैचारिक वारसा कोणी दिला असता, असा प्रश्न पडतो. गांधी विचारांचे निर्दालन करणारे आपल्याच मदतीने सत्तेत जातात, हाही गांधींचा नसून आपलाच पराभव आहे.गांधींचा वारसा सर्वाधिक शुध्द, भव्य आणि मानवतावादी आहे, आणि तोच पुढे नेला पाहिजे. 

महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, सचिव अन्वर राजन , मोहन छाजेड, संदीप बर्वे, जांबुवंत मनोहर, तुषार झरेकर, अप्पा अनारसे व्यासपीठावर  उपस्थित होते. अन्वर राजन यांनी प्रास्ताविक केले,संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.संविधानाच्या पुढे जायचे की संविधानाच्या मागे जायचे, हे आपल्याला ठरवायचे आहे. मात्र, कितीही बहुमत असले तरी संविधान बदलता येणार नाही, असे गांधी विचारांच्या आधारे आपल्याला सांगता आले पाहिजे, असे बोलताना डॉ सप्तर्षी यांनी सांगितले.             

Web Title: defeat comes when an MP like Pragya Singh Thakur gets elected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.