फाटक्या झोळीलाही दिवाळीचे स्वप्न!
By Admin | Updated: November 8, 2015 03:04 IST2015-11-08T03:04:42+5:302015-11-08T03:04:42+5:30
पोटासाठी पाठीवरचं जगणं घेऊन फिरणं एवढंच त्यांना ठाऊक. ना घर ना दार. धरणीमाईच्या कुशीत शिरून आकाशाच्या छताखाली पडायचं, हेच वास्तव्य आणि हाच विसावा.

फाटक्या झोळीलाही दिवाळीचे स्वप्न!
- हिनाकौसर खान पिंजार/प्रज्ञा केळकर-सिंग , पुणे
पोटासाठी पाठीवरचं जगणं घेऊन फिरणं एवढंच त्यांना ठाऊक. ना घर ना दार. धरणीमाईच्या कुशीत शिरून आकाशाच्या छताखाली पडायचं, हेच वास्तव्य आणि हाच विसावा. पुढच्या दिवसाचा ठिकाणाही ज्यांना ठाऊक नाही...त्यांच्यासाठी दिवाळीचा सण तो काय असेल? ज्या दिवशी हाता- पोटाची भेट तिच दिवाळी, तरीही आपल्या फाटक्या झोळीची खंत न बाळगता आपल्या पोराबाळांनाही दिवाळीचे कपडे आणि खाऊ मिळावा, यासाठी कष्टकरी शहरातील रस्त्यांवर अंगमेहनत करताना दिसत आहेत.
आपापले गाव-पाड्या, वस्ती सोडून शहरात ठिकठिकाणच्या फुटपाथवर, रस्त्यावर काही कुटुंबांनी आपलं ‘घर’ मांडलेले दिसेल. पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून, परराज्यातून कुटुंबच्या कुटुंबं येऊन शहरातल्या गर्दीत मिसळतात. आज इथे, तर उद्या पुन्हा कुठेतरी. त्यांच्याच शब्दांत सांगायचे, तर ‘सीझनप्रमाणे’. पाठीवर जगणं घेऊन फिरणाऱ्या या कुटुंबातही दिवाळीचे दिवे पेटतात का? चिवडा-चकली-करंजी असते यांच्या दिवाळीफराळात? की अंधातरित वर्तमान आणि अंधारमय भविष्य असणाऱ्या, या माणसांसाठी दिवाळीचं काय सोयरसुतक?
‘दिवाली हम भी मनायेंगे ना, जैसे सब मनाते है. पटाखे जला देंगे और क्या?’ सोनी, खलबत्त्याच्या पाटावर लाल मिरचीचे वाटण वाटत बोलत होती. मूळची दिल्लीची. अकराव्या वर्षी लग्न झाले आणि संसाराला जुंपली. नवरा मध काढायचं काम करतो. संध्याकाळी अंधार पडण्या आधी स्वयंपाक करण्यासाठी तिची धांदल सुरू आहे. जन्मापासून रस्त्यावरच ती जगलीये. शाळा कधी पाहिली नाही ना पाहावीशी वाटली. आज इथे, तर उद्या अन्य कुठे. भटकण्याविषयी आणि रस्त्याच्या कडेलाच संसार मांडण्याविषयी तिला खंतच नाही. ती म्हणते, नवरा काम करतो, मुले थोडी मोठी झाली की काही ना काही कामधंदे करतात. स्थैर्यच नाही, तर शाळेत कुठून जाणार? कपडे-पैसे जमले तर नवे कपडे घेऊ, नाहीतर कोणी दिले तर घालू. फराळ वगैरे काही बनवत नाही. ज्या दिवशी चांगले जेवायला मिळते तीच आमची दिवाळी! वाटण वाटणाऱ्या तिच्या हाताची लालबुंद धग आमच्याही जिव्हारी लागली.