पुणे : ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नी दीपाली कोल्हटकर यांचा खून त्यांचा नोकर किसन मुंडे याने केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अलंकार पोलिसांनी नोकराला ताब्यात घेतले आहे. दीपाली तसेच त्यांच्या मातोश्री आशा सहस्रबुद्धे (वय ८५) एरंडवणे भागातील मैथिली अपार्टमेंटमध्ये राहायला आहेत. तीन वर्षांपासून दिलीप कोल्हटकर आजारपणामुळे अंथरुणाला खिळून आहेत. गुरुवारी सायंकाळी दीपाली जळालेल्या अवस्थेत फ्लॅटमध्ये आढळल्या होत्या. ससून रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्या मृत झाल्याचे घोषित केले होते.मैथिली सोसायटीत सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. घरातून किंमती ऐवज चोरीला गेलेला नाही, त्यामुळे खुन्यापर्यंत पोहोचणे पोलिसांपुढे आव्हान ठरले होते. गळा दाबून तसेच डोक्यावर कठीण वस्तूने प्रहार केल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले होते. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांना पेटवून देण्यात आल्याची शक्यता गृहीत धरून तपास केल्यावर नोकर किसन मुंडेवर पोलिसांचा संशय बळावला.कोल्हटकर यांच्याकडे किसन मुंडे दररोज बारा तासासाठी येत असतो. मात्र गुरुवारी तो एक तास आधीच तेथून गेल्याचे तपासात समोर आले आहे. त्याची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून अटक करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.कोल्हटकर दाम्पत्याचा मुलगा अन्वय अमेरिकेहून शनिवारी पुण्यात पोहोचला. त्यानंतर पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दीपाली कोल्हटकर यांचा नोकरानेच केला खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 10:40 IST