पुणे : बनावट दस्तऐवज तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले माजी नगरसेवक दीपक मानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी बनावट दस्तऐवज तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे मानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामध्ये माझा राजकीय आलेख पाहता, काही समाजकंटकांकडून माझी राजकीय बदनामी केली जात आहे.
मी काही वर्षांपूर्वी केलेल्या जमिनीच्या आर्थिक व्यवहारात, आता तीन-चार दिवसांपूर्वी या जमिनीच्या आर्थिक व्यवहारात शासनाची फसवणूक केली असल्याचा गुन्हा माझ्यावर दाखल करण्यात आलेला आहे. परंतु हा गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही. या गुन्ह्यातील सत्यता न पडताळता, येणारी महानगरपालिका निवडणूक तसेच माझी राजकीय कारकिर्द मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.
सदर आर्थिक व्यवहार हा माझ्या जमिनीसंदर्भात झालेला असून त्यामध्ये माझ्याकडून कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा फसवणुकीचा प्रकार झालेला नाही. या प्रकरणामुळे आपल्या पक्षाची व आपली नाहक बदनामी होत असून त्यामुळे पक्षश्रेष्ठींना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे माझा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराध्यक्षपदाचा राजीनामा मंजूर करण्यात यावा, अशी मागणी दीपक मानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.