Dedicated educationalist professor Rajaram Sabnis | समर्पित शिक्षणव्रती प्रा. राजाराम सबनीस

समर्पित शिक्षणव्रती प्रा. राजाराम सबनीस

- राजेश हेन्द्रे
आजकाल नानाविध अभ्यासक्रमांची संथा देणाऱ्या अनेक शिक्षणसंस्था अवतीभोवती भव्य वास्तुरूपाने उदयाला आलेल्या दिसतात. पण स्वातंत्र्यपूर्व काळात देशातील ग्रामीण भागाला शिक्षणाअभावी अक्षरशत्रुत्वाचा विळखा पडला होता. अशा वेळी देशाच्या कानाकोप-यात अनेक ज्ञानव्रतींनी ज्ञानाचा जागर मांडला आणि अंधश्रद्धांच्या अंधारात चाचपडणा-या समाजाला शिक्षणाद्वारे ज्ञानाचा प्रकाश दाखविण्यासाठी ते पुढे सरसावले. त्यातलेच एक नाव म्हणजे जुन्नर तालुक्यातील गुरुवर्य प्राचार्य राजाराम परशुराम सबनीस.

पांढराशुभ्र सदरा, डोक्यावर जुन्या पद्धतीची अलगदपणे पण घट्ट बसणारी काळी टोपी, तेज:पुंज चेहरा, काहीसे मिश्कील व बोलके डोळे, लोकमान्यांसारख्या वरच्या ओठावरून थोड्या पुढे खाली वळणा-या पांढ-या भरघोस मिशा अशा अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्त्वाच्या प्राचार्य सबनिसांचे तसबिरीतून दर्शन होताच पाहणा-याचे मन क्षणार्धात आदराने लवते! प्राचार्य सबनीस यांचा जन्म ५ फेब्रुवारी १८९४ रोजी सांगली जिल्ह्यातल्या वाळवे तालुक्यातील उरुण-इस्लामपूर या गावी झाला. गेल्या वर्षी ५ फेब्रुवारीला त्यांच्या जन्माची सव्वाशताब्दी पूर्ण झाली.

ब्रिटिश अमदानीतील हा खूप जुना काळ आहे. सन १९0९ मध्ये झालेल्या मॅट्रिकच्या परीक्षेत ते त्या काळच्या मुंबई इलाख्यात, म्हणजे गुजरात, महाराष्ट्र, धारवाड अशा मोठ्या शिक्षण प्रांतात नववे आले होते. १९१३ मध्ये ते बी. ए. झाले तेव्हा ते मुंबई विद्यापीठात दुसरे आले होते. त्या वेळी अनेक शिष्यवृत्त्या त्यांना मिळाल्या होत्या. शिक्षक असलेल्या वडिलांनी त्यांना १९१४ मध्ये म्हणजे पहिल्या जागतिक महायुद्धाच्या सुमारास आयसीएससाठी इंग्लंडला पाठविले. परंतु ब्रिटिश सरकारच्या हिंदुस्थानच्या राजवटीत कलेक्टर, कमिशनर असे सनदी अधिकारी होण्यात त्यांना काहीच रस नव्हता. मायदेशात शिक्षणाअभावी पसरलेला अंधार त्यांना दूर करायचा होता. म्हणून १९१६ मध्ये केंब्रिज विश्वविद्यालयातून एम.ए.ची पदवी संपादन करून मायदेशी परतताच त्यांनी ज्ञानदानसत्राला आरंभ केला.

प्रथम पुण्यातील नू.म.वि. प्रशालेचे अधीक्षक व नंतर सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी तीन वर्षे काम केले. पण त्यांचे मन शहरातील शिक्षणसंस्थांत रमेना. यामध्ये त्यांची मूलभूत तात्त्विक विचारसरणी होती. त्यांना ग्रामीण भागातील मुलांसाठी, जिथे प्राथमिक शिक्षणाच्या पलीकडे कुठल्याही शैक्षणिक सोयी नाहीत, अशा ठिकाणी पुढील प्रगत ज्ञान देण्याचे कार्य अभिप्रेत होते. त्यामुळे पुण्यातील प्राचार्यपदाचा राजीनामा देऊन संकल्प आणि सिद्धी यातले अंतर मिटवत त्यांनी १९३५ मध्ये जुन्नर येथे ‘न्यू इंग्लिश स्कूल जुन्नर’ (आत्ताचे शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय) व नंतर १९४४ मध्ये नारायणगाव येथे ‘विद्यामंदिर’ (आत्ताचे प्राचार्य रा. प. सबनीस विद्यामंदिर) अशा दोन शैक्षणिक संस्थांची मुहूर्तमेढ रोवली. ही दोन शिक्षणमंदिरे म्हणजे दूरदृष्टीने त्यांच्या दोन डोळ्यांत उतरलेली भविष्यातील सोनेरी स्वप्ने होती.

या स्वप्नांना सत्यसृष्टीत आणताना त्यांनी अक्षरश: सर्वसंगपरित्याग केला. आपली सर्व स्थावर व जंगम मालमत्ता विकून संस्था उभारणीसाठी सुमारे १ लाख रुपये त्या काळात दिले. आजच्या काळात या रकमेचे मूल्य कित्येक कोटींमध्ये होईल. पुढे निवृत्त झाल्यावरही निवृत्तीवेतनातील फक्त पन्नास रुपये स्वत:च्या चरितार्थासाठी ठेवून बाकी पैसे शाळेस देत असत. त्यांचा हा पराकोटीचा निरलसपणा पाहून अनेक हात मदतीसाठी पुढे आले. त्यांच्या काळात अनेक विख्यात राजकारणी, साहित्यिक, कलावंत व विचारवंत यांनी या विद्यामंदिराला भेटी दिल्या. पंडित सातवळेकर, सर चिंतामणराव देशमुख, धनंजयराव गाडगीळ, काकासाहेब गाडगीळ, रँग्लर र. पु. परांजपे, मामासाहेब दांडेकर, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब खेर, भाऊसाहेब हिरे आदी मोठमोठ्या मंडळींचा यात समावेश होता.

प्राचार्य अखेरपर्यंत अविवाहित राहिले. हभप शं. वा. ऊर्फ मामासाहेब दांडेकर व महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचे ते परममित्र. त्या वेळी प्रचलित असलेली एक आख्यायिका अशी होती, की हे तिघे जण जेव्हा उच्च शिक्षण घेत होते, तेव्हा या तिघांनी अशी प्रतिज्ञा केली होती, की आजन्म ब्रह्मचारी राहून अंतिम श्वासापर्यंत देश व समाजाची सेवा करायची. त्याप्रमाणे या तिघा महापुरुषांनी आपापली कार्यक्षेत्रे निवडली व अखंड ब्रह्मचारी राहून देशसेवा करत आपले व्रत पाळले.

अखेर वयाच्या ६६व्या वर्षी व्रतस्थ असतानाच २५ सप्टेंबर १९६0 रोजी या शिक्षणव्रताची प्राणज्योत अकस्मात मालवली आणि अनोख्या व्रताची सांगता झाली. इंग्रजी आणि संस्कृतचा दांडगा व्यासंग असलेले प्राचार्य जीवनाचे नम्र उपासक होते. त्यांची उपासना श्रेष्ठ दर्जाची होती. म्हणूनच भारताचे माजी अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांनी त्यांच्याविषयी म्हटले आहे- Through the course of busy and long life, I have met hundreds of good men, but never have I met one as good as R. P. Sabnis. आपल्या ज्ञानदानाच्या व्रतात संस्कारशील मुलांच्या मनावर प्राचार्य ‘कर्मसिद्धान्त’ म्हणजे ‘फिलॉसॉफी ऑफ वर्क’ची तत्त्वे ठसवत असत. ते सांगत-  kWork, work, work. Work makes a dull man bright and a bright man brilliant. आजही या शाळेतून बाहेर पडणारी मुले मनात हाच भाव घेऊन बाहेर पडतात.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Dedicated educationalist professor Rajaram Sabnis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.