आळंदी : पालखीमार्ग रुंदीकरणावरून आळंदीतील राजकारण आता तापू लागले असून, येथील भाजपा व काँग्रेस कार्यकर्ते आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. आळंदी शहराचा विकास आराखडा मुख्यमंत्र्यांच्या सहीनिशी मंजूर करून प्रकाशित करण्यात आला. तेव्हा आळंदी-पुणे रस्ता ६0 मीटर रुंद दाखविण्यात आला होता. ज्याची प्रॉपर्टी यात जात आहे, ते रुंदीकरणाला विरोध करीत होते. नुकत्याच झालेल्या बैैठकीत हा रस्ता ६० ऐवजी ४५ मीटर करण्यात आल्याचा उघड झाले आणि येथील राजकारण तापू लागले आहे. स्थानिक नागरिक व राजकीय पक्षांनी या विरोधात आंदोलन करत रुंदीकरण बंद पाडले असून, पालखी सोहळा पार पडेपर्यंत काम सुरू न करण्याची मागणी केली आहे.स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन करून काम बंद पाडले. पालकमंत्री भेट देऊन निर्णय घेणार असल्याचे सूतोवाच केले आहे.यावर आता शहर काँग्रेसने आक्षेप घेतला असून, शहराध्यक्ष नंदकुमार वडगावकर यांनी मंजूर नकाशात बदल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई त्वरित करण्यात यावी, अन्यथा संबंधितांविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. आळंदीतील बाहेरील रस्त्यांची रुंदी कोणत्याही परिस्थितीत कमी न करणेच योग्य असून, त्यामुळे वाहतूककोंडी सुटणार आहे. उत्तर आळंदीतील प्रदक्षिणा रस्त्यांचे रुंदीकरण करू नये. (वार्ताहर)
पालखी मार्ग रुंदीकरणावरून भाजपा-काँग्रेसमध्ये वाद
By admin | Updated: June 17, 2016 05:04 IST