भुलेश्वर : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथे ट्रॅक्टर पल्टी होऊन शांताराम जगन्नाथ यादव यांचा जागीच मृत्यु झाला. ते चाळीस वर्षांचे होते. दिवसभर शेताची नांगरणी करुन माळशिरस - यवत रस्त्यावरुन रविवारी रात्री पावणेआठ वाजता घरी येत असताना गावापासुन अर्धा किलोमीटर अंतरावर वळणावर त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर (एमएच- १२.जेएन. ४७३९)हा थेट खोल चारीत जाऊन पलटी झाला. चारही चाके वर झाल्याने शांताराम यादव हे स्टेरींगमध्ये अडकले व त्यांचा जागीच मृत्यु झाला. ही बातमी माळशिरसमध्ये समजल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. जेसीबी मशिनच्या साह्याने ट्रॅक्टरच्या खाली अडकल्याने यादव यांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र, त्या अगोदरच त्यांचा मृत्यु झाला होता. त्यानंतर यवत येथे शवविच्छेदन करुन रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने माळशिरस परिसरात शोककळा पसरली आहे. त्याच्या मागे आई ,वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
माळशिरस येथे ट्रॅक्टर पलटी होऊन एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 14:18 IST