खड्ड्यात पडून पादचाऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2016 01:38 IST2016-04-06T01:38:17+5:302016-04-06T01:38:17+5:30
येथील पर्णकुटी टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या गल्लीमध्ये पुणे महापालिकेच्या वतीने ड्रेनेजलाईन टाकण्यासाठी घेतलेल्या खोल खड्ड्यामध्ये सोमवारी (दि. ४) रात्री नऊच्या सुमारास पाय

खड्ड्यात पडून पादचाऱ्याचा मृत्यू
येरवडा : येथील पर्णकुटी टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या गल्लीमध्ये पुणे महापालिकेच्या वतीने ड्रेनेजलाईन टाकण्यासाठी घेतलेल्या खोल खड्ड्यामध्ये सोमवारी (दि. ४) रात्री नऊच्या सुमारास पाय घसरून पडलेल्या इसमाचा गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. येरवडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
शंकर कुमार मात्रे (वय ५०, रा. वैदवाडी हडपसर, सध्या रा. लक्ष्मीनगर येरवडा) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे. मात्रे हे बिगारी काम करीत होते. त्यांच्या पत्नीचे लक्ष्मीनगरमध्ये माहेर असून, त्या इकडे राहत असल्याने मात्रे हेसुध्दा लक्ष्मीनगरमध्येच राहत होते.
पुणे महापालिकेच्या वतीने मागील सुमारे ३ महिन्यांपासून पर्णकुटी पायथ्याशी असलेल्या गल्लीमध्ये ड्रेनेजलाईनचे काम सुरू आहे. या कामात दिरंगाई होत असल्याच्या अनेक नागरिकांनी संबंधितांकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून ही खोदाई करण्यात आली. विशेष म्हणजे याठिकाणी ड्रेनेजलाईन टाकण्यासाठी यापूर्वीही खोदाई करण्यात आली होती. त्यानंतर ड्रेनेजलाईन टाकून खड्डे बुजवून रस्ता पूर्ववत करण्यात आला. मात्र, हे काम योग्य न झाल्याने रस्त्याची पुन्हा १५ ते २० फूट खोल खोदाई करण्यात आली. त्यामध्ये पडून मात्रे यांचा बळी गेला.
खड्ड्यात पडल्यानंतर स्थानिक तरुणांनी त्यांना दोरीच्या साहाय्याने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी येरवडा अग्निशमनचे जवान घटनास्थळी आले. अग्निशमनच्या जवानांनी मात्रे यांना बाहेर काढून ससून रुग्णालयात नेले, मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.