पुणे : सिंहगड रोडवरील माणिकबाग येथील एका बंद फ्लॅटमध्ये तरुणी मृतावस्थेत आढळून आली. तिचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तेजशा शामराव पायाळ (वय२९, रा. राधाकृष्ण अपार्टमेंट, माणिकबाग) असे या तरुणीचे नाव आहे. सिंहगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजसा मूळची बीड जिल्ह्यातील असून तिचे एमबीएचे शिक्षण झाले आहे. ती हिंजवडी येथील एका कंपनीत नोकरी करते. गेल्या दोन वर्षांपासून ती माणिकबाग परिसरात वन बीएचके फ्लॅट भाड्याने घेऊन तिच्या दोन बहिणी व आईसह राहत होती. मात्र सध्या दोन्ही बहिणी व आई या फ्लॅटमध्ये वास्तव्यास नव्हत्या. तेजसा २७ नोव्हेंबरला तिच्या मूळगावावरून माणिकबागेतील फ्लॅटमध्ये राहायला आली होती. तेजसाची आई शनिवारपासून तिला संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती. मात्र संपर्क होऊ न शकल्याने आई सोमवारी बीडवरून तेजसा राहत असलेल्या फ्लॅटवर आली असता फ्लॅटला कुलूप असल्याचे दिसले. त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या दुसऱ्या चावीने कुलूप उघडून आत प्रवेश केला असता, बेडवर संशयास्पद अवस्थेत तेजसाचा मृतदेह दिसला. त्यांनी तत्काळ पोलिसांना बोलावले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी ससूनला पाठवला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे सिंहगड रोड पोलिसांकडून सांगण्यात आले. तेजसा हिच्या गळ्यावर व्रण दिसून आले असून घरात दारूच्या बाटल्याही आढळून आल्या आहेत. यावरुन तिचा खून करण्यात आला असावा, असा संशय पोलिसांना आहे.
सिंहगड रोडवरील फ्लॅटमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह; हत्येचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 15:04 IST