DCM Ajit Pawar on Baburao Chandere: पुण्यात टोळक्यांची दहशत सुरु असतानाच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी एकाला मारहाण केल्याचे समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. त्यानंतर आता या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. बाबुराव चांदेरे यांच्या विरोधात पुण्यातील बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हे खपवून घेणार नाही असा इशारा दिला आहे.
माजी नगरसेवक असलेले बाबुराव चांदेरे यांची कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसत असतात. शनिवारी एका वादावरुन बाबुराव चांदेरे यांनी विजय रौंदळ नावाच्या व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. बाबुराव चांदेरे यांनी त्या व्यक्तीला चापट मारत उचलून जमिनीवर आदळले. त्यानंतर ही व्यक्ती जखमी झाली आणि तिला डोक्याला व गुडघ्याला दुखावत झाली. यावेळी चांदेरे यांनी व्हिडीओ शूटिंग करणाऱ्या व्यक्तीला देखील दमदाटी केली. त्यानंतर आता या प्रकरणात बाबुराव चांदेरे यांच्या विरुद्ध रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या सगळ्या प्रकारावरुन अजित पवार यांनीही नाराजी व्यक्त करत इशारा दिला आहे.
काय म्हणाले अजित पवार?
"मी ती छोटी व्हिडिओ क्लिप पाहिली. हे अतिशय चुकीचं आहे. कोणालाही कायदा हातामध्ये घेता येत नाही. तो अधिकार आपण कोणालाही दिलेला नाही. त्यामुळे मी त्याला सकाळी फोन केला होता. पण त्याने फोन डायव्हर्ट केला होता. त्याच्या मुलाशी मी बोललो. मुलगा म्हणाला की ते घरी नाहीत. मी त्याला म्हटलं की हे जे काही मी क्लिपमध्ये बघितलं ते मला अजिबात आवडले नाही. अशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी केलेले मी खपवून पण घेणार नाही. मला त्याला बोलवून जाब विचारायचा आहे की याच्या पाठीमागचं कारण काय. समोरच्याने तक्रार दिली तर कारवाई होईल. ज्याला कोणाला लागलं आहे त्यांनी पण तक्रार दिली पाहिजे. तक्रार केल्यानंतर कारवाई होणारच," असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, यापूर्वीही चांदेरे हे अनेकदा वादात अडकले आहेत. दोन वर्षापूर्वी बाबुराव चांदेरे यांनी एका रिक्षाचालकाला मारहाण करीत शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला होता. त्यानंतर गेल्याच वर्षी बाबुराव चांदेरे यांनी पुण्यातील बालेवाडी क्रीडासंकुलात आयोजित कब्बडी स्पर्धेत पंचावर हात उगारला होता. पंचांनी दिलेला निर्णय न पटल्याने बाबुराव चांदेरे संतप्त झाले आणि त्यांनी पंचाना शिवीगाळ करत हात उगारला होता. यापूर्वी त्यांच्या मुलावर अपहरणाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.