पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात
By Admin | Updated: May 5, 2017 02:46 IST2017-05-05T02:46:03+5:302017-05-05T02:46:03+5:30
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानामुळे मनुष्याचीही उन्हाच्या चटक्यांनी लाहीलाही होत आहे. अशा वातावरणात सिमेंटच्या

पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात
रावेत : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानामुळे मनुष्याचीही उन्हाच्या चटक्यांनी लाहीलाही होत आहे. अशा वातावरणात सिमेंटच्या जंगलात वावरत असताना प्रतिकार शक्ती कमी असलेल्या पक्ष्यांचे हाल होत आहेत. यामुळे परिसरात आढळणाऱ्या पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. याकरिता नागरिकांनी झाडे व घरांच्या छतांवर पक्ष्यांना पाणी पिण्याची सोय करून देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन विविध क्षेत्रांतून होत आहे.
दरम्यान पक्ष्यांसाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून ते जगवावे, असे आवाहन पर्यावरण प्रेमी करीत आहेत. सिमेंटच्या इमारतींमध्ये झाडे हरवली, वाढती लोकसंख्या आणि आधुनिकीकरणाच्या जगतात शहरातील झाडांची संख्या घटली आहे. यातच शहरातील उद्यानांची दुरवस्था झाली असल्याने झाडे बोटावर मोजण्या इतकीच उरली आहेत. सिमेंटच्या भिंतींनी शहराला वेढा घातला आहे. झाडांची संख्या घटल्याने आसऱ्याकरिता पक्ष्यांना वणवण फिरावे लागत आहे.(वार्ताहर)
पक्षी मे महिन्यात घरटे बांधण्यास सुरुवात करतात आणि एक महिन्यानंतर त्या घरट्यात ठेवलेल्या अंड्यातून पिलं बाहेर येतात. तोपर्यंत पावसाळा सुरू होत असतो. जेणेकरून गवत, पालापाचोळा व पाणी उपलब्ध होते. कीटक, अळ्या, फुले, फळे हे पक्ष्यांचे अन्न मुबलक प्रमाणात उपलब्ध होते आणि पिल्लांची वाढ जोमात होते. म्हणून उन्हाळ्यात पक्ष्यांचा विणीचा हंगाम असल्यामुळे आपल्याकडून काही मदतीची त्यांना गरज असते. ती गरज फूल व फळे देणारी झाडे लावल्याने पूर्ण होऊ शकते. - सुहास भालेकर, पक्षिमित्र
पक्ष्यांचा कळवळा मेसेजपुरताच
पक्ष्यांना वाचवा, असा संदेश देणारे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. पक्ष्यांसाठी घराच्या गच्चीवर पाणी ठेवा, खाद्य ठेवा असे मेसेज न चुकता एकमेकांना पाठविले जात आहेत. प्रत्यक्षात कृती फार कमी जण करताना दिसून येतात. मेसेज फॉरवर्ड करण्यापुरतेच पक्ष्यांचा कळवळा पाहण्यास मिळत आहे.
भूतदया : पक्ष्यांसाठी पाण्याची सोय
उन्हाच्या कडक वातावरणात पक्ष्यांना पाणी मिळत नसल्याने जिल्ह्यातील पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. पक्षिमित्रांसह काही निवडक नागरिकांनी आपल्या घराच्या छतावर, खिडक्यांवर, झाडांवर, गॅलरीत पक्ष्यांना पाणी मिळावे यासाठी छोट्या कुंड्या ठेवल्या आहेत. पक्ष्यांना पाणी पिण्याकरिता सोयीस्कर व्हावे तसेच परिसरातील पक्ष्यांच्या संख्येत पुन्हा वाढ व्हावी यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.