पुणे : पश्चिम बंगालच्या उपसागरात शनिवारी सकाळी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्याचे रविवारी सकाळी चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. यामुळे तामिळनाडुची किनापट्टी व आंधप्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीवर १४ नोव्हेंबरपासून जोरदार पावसाची शक्यता आहे. अंदमान आणि निकोबार बेटसमुहाच्या परिसरात शनिवारपासून जोरदार पाऊस पडत आहे.
पश्चिम बंगालच्या उपसागरात शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून तो सध्या पोर्ट ब्लेअरपासून दक्षिण पश्चिम बाजूला असून तो चिन्नईपासून १३४० किमीवर तर, नेल्लोरच्या (आंध्र प्रदेश) पूर्वदक्षिणपूर्व बाजूला १३९० किमी वर आहे. पुढील २४ तासात त्याचे रुपांतर चक्रीवादळात होणार असून ते ४८ तासात पश्चिम उत्तरपश्चिमेकडे वळण्याची शक्यता आहे. सध्या या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अंदमान बेटादरम्यान ताशी ४५ ते ५५ किमी वेगाने वारे वाहत आहे. ते तामिळनाडुजवळ येईल तेव्हा वाºयाचा वेग ताशी ११० किमीपर्यंत वाढू शकेल. पुढील चार दिवस मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये. जे मच्छीमार सध्या समुद्रात गेले आहेत, त्यांनी लवकरात लवकर सुरक्षितपणे किनाराकडे परत यावे असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.