Customer is making fool by companies | ग्राहक राजाला बनवले जातेय मूर्ख :  कंपन्यांची दिशाभूल 
ग्राहक राजाला बनवले जातेय मूर्ख :  कंपन्यांची दिशाभूल 

ठळक मुद्देचहाच्या एकाच ब्रँडची वेगवेगळी किंमतउत्पादनांच्या वाढीव किंमतीचा वापर एकावर एक मोफत देण्यासाठी केला जात असल्याचे समोर

विशाल शिर्के 
पुणे : ग्राहक हा राजा असतो असे म्हटले जात असले तरी त्याला विविध माध्यमातून मूर्ख बनविण्याचे काही कंपन्यांचे उद्योग अजूनही सुरुच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. शहरातील एक कंपनी आपले एकाच पद्धतीचे उत्पादन दोन वेगवेगळ्या कमाल किरकोळ विक्री (एमआरपी) किंमतीला विकत आहे. एक किलो वजनाच्या एकाच प्रकारच्या चहाची पिशवी २४० आणि ४०० रुपये आहे. एकाच उत्पादनाची दोन किंमतींना विक्री करण्याबरोबरच, या उत्पादनांच्या वाढीव किंमतीचा वापर एकावर एक मोफत देण्यासाठी केला जात असल्याचे समोर आले आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने पोलीस आणि वैधमापन शास्त्र विभागाकडे तक्रार करुनही त्याची कोणतीच दखल घेतली जात नाही, हे विशेष! 
ग्राहक हा बाजारपेठेतील राजा मानला गेला आहे. काही कंपन्या मात्र, विविध युक्ती वापरुन ग्राहकांची चक्क फसवणूक करीत असल्याचे समोर आले आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पुणे महानगर अध्यक्ष विजय सागर यांनी ही बाब समोर आणली असून, पोलीस आणि वैधमापन विभागाकडे तक्रार दिली आहे. मार्केट यार्ड येथील एका कंपनीच्या रॉयल आणि जॉयल या चहाच्या दोन ब्रँड विरोधात ही तक्रार आहे. 
या दोनही ब्रँडच्या पॅकींगचे रंग आणि त्यातील पदार्थ एकच आहेत. असे असताना रॉयल ब्रँड आणि जॉयल या ब्रँडची प्रत्येकी दोन वेगवेगळ््या किंमतीतील पाकिटे बाजारात उपलब्ध आहेत. काही दुकानांमधे एका पॅकेटवर एक मोफत अशा योजनांद्वारे देखील त्याची विक्री केली जात आहे. चारशे रुपये एमआरपी असलेले रॉयल चहाचे एक पॅकेट घेतल्यास त्यावर एक मोफत मिळेल. तसेच, त्याची किंमतही ३८० रुपये आहे. म्हणजेच एक किलो वजनाच्या रॉयल चहाची किंमत २८० आणि ४०० रुपये आहे. 
उदबत्ती, प्रथितयश कंपन्यांचीची टूथपेस्ट, सौंदर्य प्रसाधनाची क्रीम, जंतूनाशक कंपन्यांचे साबण, दररोजच्या वापरातील साबण, थंडीपासून त्वचेचे संरक्षण करणारी पेट्रोलियम जेली, चहा, शॅम्पू, कपड्यावरील कोणताही डाग काढून टाकण्याचा दावा करणाºया कंपन्यांची पावडर आणि बिस्कीट अशा विविध उत्पादनांमध्ये कंपन्यांकडून वजन आणि त्याच्या एमआरपी किंमतीमधे लूट केली जात असल्याचे डिसेंबर २०१८मधे लोकमतने उघड केले होते. या प्रकरणी संबंधितांवर अजून कोणतीही कारवाई झालेली नाही. 
--------------


Web Title: Customer is making fool by companies
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.