खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात सर्वपक्षीय १४ पैकी ११ जणांच्या वतीने दि. २४ मे रोजी अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. सदस्य राजकीय सहलीसाठी गेले होते. डोणजे येथील एका रिसोर्टमध्ये पंचायत समिती सदस्य मुक्कामी असलेल्या ठिकाणी सभापती पोखरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जाऊन धिंगाणा घातला होता. या घटनेबाबत खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील व शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्यामध्ये आरोप प्रतिआरोपांची खैरात झाली होती. गेल्या दोन दिवसांपासून खेड समिती पंचायत इमारतीसमोर पोलिसाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सोमवारी होणाऱ्या अविश्वास ठरावासाठी प्रांत यांनी सकाळी ११ वाजता विशेष सभा बोलविली आहे. तसेच, सभापती भगवान पोखरकर यांना सभेत भाग घेण्यासाठी न्यायालयीन परवानगी मिळाली आहे. पोलीस बंदोबस्तामध्ये त्यांना राजगुरुनगर येथे आणण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून दंगल नियंत्रण पथकाची तुकडी, राज्य राखीव पोलीस दलाचे दोन प्लाटून, तसेच स्थानिक पोलीस स्टेशनकडील जास्तीत जास्त मनुष्यबळ वापरले जाणार आहे. कायद्याचे तसेच संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे पोलिसांनी सांगितले. वाडा रोडवर पाण्याची टाकी ते मारुती मंदिर जाणारा रस्ता, तसेच तिन्हेवाडी रोडवर टेल्को काॅलनीपर्यंतचा रस्ता सकाळी ६ पासून ते सभेचे कामकाज संपेपर्यंत बंद करण्यात येणार आहे.
अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यात आज संचारबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:10 IST