सांस्कृतिक ‘स्मार्ट’नेसचे पालिकेला वावडे
By Admin | Updated: October 27, 2015 00:55 IST2015-10-27T00:55:56+5:302015-10-27T00:55:56+5:30
शिक्षणाचे माहेरघर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेले पुणे आयटी हबही झाले. अशा या पुणे शहराला स्मार्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

सांस्कृतिक ‘स्मार्ट’नेसचे पालिकेला वावडे
पुणे : शिक्षणाचे माहेरघर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेले पुणे आयटी हबही झाले. अशा या पुणे शहराला स्मार्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्या शहराची खरी ओळख गेली अनेक वर्षे साहित्य, संस्कृती, कला यामुळे आहे अशा या पुण्याचा सांस्कृतिक चेहरा स्मार्ट करण्याकडे मात्र महापालिकेचे दुर्लक्ष झाले असल्याचे महापालिकेच्या आराखड्यावरुन दिसून येते.
पुणे स्मार्ट कसे होईल यासाठी नागरिकांकडून सूचना मागविण्यात येत आहेत. पण यात सांस्कृतिक विभागाचा साधा उल्लेखही केलेला नाही ही मोठी खेदाची बाब आहे.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे पुणे शहर अशी पुण्याची अलीकडची ओळख. पण पूर्वीपासून शिक्षणाचे माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी खरी ओळख. वर्षभरात अनेक महोत्सवांची रेलचेल असते. या महोत्सवांना देशातीलच नव्हे तर परदेशातील कलाकार पुण्यात येतात. त्यामुळे पुण्याची कीर्ती देशापुरती न राहता देशाच्या सीमा ओलांडूनही दूरवर गेली आहे. अशा या पुण्याचा सांस्कृतिक चेहरा स्मार्ट होण्यासाठी पुण्याचे कर्तेधर्ते उदासिन असल्याचे दिसून येत आहे.
पुण्याचा गणेशोत्सव, पुणे फेस्टिव्हल, पुणे चित्रपट महोत्सव, सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव असे काही ठळकपणे उल्लेख करता येण्यासारखे महोत्सव. या महोत्सवात फक्त पुणेकर रसिकच सहभागी होतात असे नाही तर देश विदेशातूनही रसिक हजेरी लावतात. विशेष म्हणजे शनिवार वाडा महोत्सव, रोहिणी भाटे, पठ्ठे बापूराव तसेच स्वरभास्कर पुरस्कार महापालिका देते. या पुरस्कार वितरण सोहळ्याबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमही होतात.
कला, साहित्य, संस्कृतीला प्रोत्साहन मिळण्यासाठी मात्र ‘स्मार्ट’ आराखड्यात तरतुद नाही. रस्ते, वाहतूक, कचऱ्याची समस्या तसेच अनेक समस्या सोडविण्यासाठी ज्या प्रमाणे विभागवार सूचना मागविण्यात येत आहे त्या प्रमाणे आराखड्यात ‘सांस्कृतिक’ असा विभाग नाही. साहित्य, संस्कृती क्षेत्रातील कुण्या व्यक्तींनीही सूचना पाठविलेल्या नाहीत.
शहराचा आज मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. पण त्या अनुषंगाने नाट्यगृहे, सभागृहे नाहीत. मोजकी नाट्यगृहे आहेत पण ती छोट्या-छोट्या कार्यक्रमांसाठी घेणे आयोजकांना परवडत नाही. महापालिकेची कलादालने आहेत ती मध्यवर्ती शहरात.
लहान-लहान कार्यक्रमांसाठी मोठ्या नाट्यगृहे उपयोगाची नाहीत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या स्पर्धांसाठी तुलनेने कमी खर्चिक नाट्यगृहेच निवडली जातात.
उद्यानांमध्ये कार्यक्रम घेण्यात हरित लवादाने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे लहान-मोठे कार्यक्रम घ्यायचे कोठे असा प्रश्न भविष्यात निर्माण होणार आहेच. (प्रतिनिधी)