पुणे : सिनेसृष्टीतील बड्या अभिनेत्याच्या वाढदिवशी शेकडो फॅन त्याच्या घराच्या बाहेर गर्दी करत असतात. आपल्या आवडत्या अभिनेत्याची एक झलक पाहता यावी आणि त्यासाठी दीर्घायुष्याची प्रार्थना करता यावी, अशी त्यामागील इच्छा. असेच काहीसे चाहते आता न्यायालयातदेखील गर्दी करीत असल्याचे चित्र सर्रास पाहायला मिळत आहे.कुठल्या तरी गुन्ह्यात अटक झालेला आणि त्यानंतर पोलीस कोठडीसाठी न्यायालयात आणलेल्या आपल्या दादा, भाई, भाऊ, साहेब किंवा साहेबांच्या माणसाला भेटता यावे आणि पोलिसांना त्याला लवकर सोडावे, अशी अपेक्षा करीत हा लोंढा न्यायालय परिसरात रेंगाळत आहे. आरोपीला पोलीस कधी घेऊन येणार याची वाट पाहत त्याचे चाहते अनेकदा गेट नंबर चारच्या बाहेर थांबलेले असतात. गेटजवळ असलेल्या हातगाडीवर वडापाववर ताव मारत किंवा जवळच्या टपरीवर चहा घेत त्यांचा टाइमपास सुरू असतो. तेवढ्यात आरोपी येणार असल्याचे समजताच त्यांच्या अंगात संचार चढतो आणि सर्वजण अग्रवाल कॅन्टीनजवळ असलेल्या लॉकरजवळ आरोपीच्या जणू स्वागतासाठीच जमा होतात. आरोपीला न्यायालयात घेऊन जात असताना हळूच त्याच्याजवळ काही पुटपुट करायची. फोन करण्यासाठी मोबाइल द्यायचा किंवा त्याला काहीतरी खायला द्यायचे असे प्रकार चाहत्यांकडून सुरू होतात.न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्यानंतर आरोपीच्या चाहत्यांची निराशा होते खरी. मात्र तरीही तू टेन्शन घेऊ नको, आम्ही आहोत ना बाहेर, सर्व हॅन्डेल करू आम्ही, तू काळजी घे असा दिलासा आरोपीला देताना दिसतात. तर मध्येच हताश झालेल्या आरोपीच्या कुटुंबातील काही व्यक्तींचा टाहो फुटतो. त्यात जर आरोपीला न्यायालयीन कोठडी होऊन जामीन मिळाला तर चाहते भलतेच खूष होतात. आरोपीला मध्यभागी ठेवून त्यांची टीम आरोपी जणू आमदार-खासदारकीची निवडणूक जिंकल्याच्या आविर्भावात न्यायालयाच्या गेटवर जातात. तेथून दुचाकींचा आवाज आणि धुराडा करीत आरोपी आपल्या चाहत्यांसह दुसऱ्या कामगिरीसाठी निघतो. असा एक दिनक्रमच न्यायालयात नेहमी पाहायला मिळत आहे.दोन टोळ्यांमधील वाद आणि राजकीय गुन्हे यामध्ये सर्वाधिक गर्दीदोन टोळ्यांमधील वाद आणि राजकीय गुन्हे या दोन प्रकारांमध्ये अशी गर्दी होताना दिसते. तसेच आरोपीचा परिसरात दबदबा असेल तर गुन्हा कोणताही असो गर्दी होणारच हे ठरलेले.चाहत्यांची ही गर्दी न्यायालयीन कामकाजात अडथळा निर्माण करणार किंवा कोर्ट हॉलमध्ये गर्दी करणार असल्याची भणक लागताच पोलीसही हा ताफा अनेकदा गेटवरच रोखतात.या सर्व प्रकारांमुळे न्यायालयातील सुरक्षा व्यवस्थेवर देखील ताण पडत आहे. तर चाहत्यांच्या गर्दीमुळे न्यायालय परिसरात वाहतूककोंडी देखील झाल्याचे प्रसंग झाले आहेत.आरोपीला मनोबल देण्याचा प्रयत्नअटक झालेल्या आपल्या प्रिय व्यक्तीला मानसिक बळ मिळावे म्हणून देखील त्याच्या सान्निध्यातील पोरं न्यायालयात अगदी जातीने हजर राहतात. पोलिसी खाक्यात दबलेल्या आरोपीला धीर मिळावा म्हणून चाहते लांबूनच हात दाखवून आपली उपस्थिती दर्शवत असतात.
आरोपींच्या फॅनची होतेय गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 01:58 IST