पोहता न येणाऱ्यांची नदीवर गर्दी
By Admin | Updated: March 24, 2015 00:36 IST2015-03-24T00:36:00+5:302015-03-24T00:36:00+5:30
वय ८ वर्षांचे, दुसरीत शिकणारा राजेश. पोहता येत नाही, तरीही पवना नदीच्या थेरगाव येथील केजूदेवी बंधाराखाली नदीपात्रात मित्रांसह उतरलेला होता.

पोहता न येणाऱ्यांची नदीवर गर्दी
अंकुश जगताप ल्ल पिंपरी
वय ८ वर्षांचे, दुसरीत शिकणारा राजेश. पोहता येत नाही, तरीही पवना नदीच्या थेरगाव येथील केजूदेवी बंधाराखाली नदीपात्रात मित्रांसह उतरलेला होता. त्यासह मित्रांचीही हीच गत. अशा पोहता न येणाऱ्यांच्या झुंडीच्या झुंडी नदीपात्रात व बंधाऱ्यात पोहण्यास आल्याचे भयावह चित्र सोमवारी दिसले. रविवारीच थेरगाव येथील आकाश सोनवणे यांसह चौघांचा पवना धरणात बुडून मृत्यू झाल्याच्या बातमीने शहर सुन्न झाले. महापालिका तसेच पाटबंधारे विभागाच्या प्रशासनालाही याचे सोयरसुतक नसल्याने येथे सुरक्षारक्षकांअभावी या चिमुरड्यांचा जीव मरणाच्या डोहात लोटण्याचा संतापजनक प्रकार सुरू आहे.
ताथवडे येथील जेएसपीएम विद्यालयात शिकणाऱ्या आकाश सोनवणे (रा. थेरगाव), शुभम मुळे (रा. गेवराई), निखिल येवले (अकोला), किरण अहंकारे (पिंपरी) या चौघांचा पवना धरणात पोहण्यास गेले असताना रविवारी बुडून मृत्यू झाला. या गंभीर प्रकारानंतरही उन्हाचे चटके वाढले असताना पाण्याच्या ओढीने केजूदेवी बंधाऱ्यात रविवारी व सोमवारी पोहण्यास व डुंबण्याचा आनंद घेण्यास येणाऱ्या मुलांचे प्रमाण नियंत्रणाबाहेर होते. यामध्ये वीस वर्षांपुढील तरुणांचा समावेश होताच. त्यात पोहताही येत नाही, अशा ७ ते २० वयोगटातील मुलंच मोठ्या प्रमाणात येत आहेत. बंधाऱ्याखाली उंचावरून पडणाऱ्या पाण्यात खेळणे व केजूदेवी मंदिरापासून खालपर्यंत नदीपात्रात ही मुलं मरणाची भीती नसल्यासारखे उड्या मारत आहेत. बंधाऱ्यावरील खोल पाण्यातही सुर, पोहण्याच्या शर्यती लावणे, एखाद्याला जाणीवपूर्वक दमवणे, नाकातोंडात पाणी जाईपर्यंत त्याला दोघा-चौघांकडून डोकं दाबणे, त्याची घाबरगुंडी उडेपर्यंत जीवघेणी चेष्टा करणे असे प्रताप सुरू आहेत.
यामध्ये शाळेतून लवकर सुटी मिळाल्याने आणखी एका समूहापैकी पाचवीत शिकणाऱ्या रोहन वगळता त्याच्या मित्रांना पोहताच येत नव्हते. मात्र, हे सर्व जण नदीपात्रात उतरले.
ही धोकादायक स्थिती पाहता येथे सध्या कोणतीच सुरक्षा व्यवस्था केलेली नाही. मुलांना बंधाऱ्यावर जाण्यापासून अटकाव करण्यास सुरक्षारक्षक सोडाच; प्रशासनाने साधे सूचनाफलक नाहीत.
पाटबंधारे विभागाचे अधिकारीही सुरक्षारक्षक नेमण्याची तरतूद नसल्याचे सांगत परिस्थितीचे खापर लोकांच्या माथी मारतात.
१ रावेत येथील बंधाऱ्यावर कायम आहे. येथे साठलेल्या गाळात रुतून एखाद्याचा बळी जाण्याचा धोका आहे. येथे नदी पोहून पार करणे व ठरावीक अंतरापार सलग पोहण्याची जीवघेणी स्पर्धा सुरू असते. त्याला पायबंद घालण्याची नितांत गरज आहे. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
२सध्या पालिकेच्या जलतरण तलावामध्ये पोहण्यास गर्दी वाढत आहे. मागील वर्षी चिंचवडच्या तरण तलावात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता. त्यामुळे असा गलथानपणा टाळून या वर्षी येथेही सुरक्षेचा चोख बंदोबस्त करणे गरजेचे आहे. परंतु येथे सुरक्षारक्षक नाही.
३या गंभीर प्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकारी सुरक्षेबाबत
हात वर करून मोकळे होत आहेत. बोट क्लबच्या कंत्राटाचे कारण पुढे करीत
सुरक्षा विभागाने जीवरक्षकांच्या नेमणुकीबाबत सुरक्षा अधिकारी प्रकाश गायकवाड यांनी कानावर हात ठेवले.
४ महापालिकेच्या उद्यान विभाग व
सुरक्षा विभागाने जबाबदारी
झटकण्याचा चपखलपणा
दाखविण्यात कसर सोडली नाही. ही पाटबंधारे विभागाची जागा आहे. सुरक्षेची जबाबदारी त्यांचीच असल्याचे सांगायलाही अधिकाऱ्यांनी मागे-पुढे पाहिले नाही.
धरणापासून शहरापर्यंत नदीचा पसारा ६० किलोमीटर आहे. नदीत कायमच पाणी असते. लक्ष कसं ठेवणार? नदीत उतरायचं की नाही, हे लोकांनीच ठरवलं पाहिजे. आम्हाला लोक किती दाद देतील, याबाबत शंका आहे. पोलिसांनी ही जबाबदारी घेतल्यास बरे होईल. विभागाकडे सुरक्षेसाठी खास माणसांची नेमणूक नाही. मात्र, महानगरपालिका व पोलिसांशी चर्चा करून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल.
- नानासाहेब मठकरी,
उपविभागीय अभियंता,
पाटबंधारे विभाग