चाकण : बदनामीची भीती दाखवत, विनयभंग करणाऱ्या कथित पत्रकारावर विनयभंग, धमकी , शासकीय कामात अडथळा अशा विविध कलमान्वये चाकण पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. ७) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण मधील एका शासकीय महिला अधिकाऱ्याने या बाबत फिर्याद दिली असल्याची माहिती चाकण पोलिसांनी दिली आहे. आशिष ढगे पाटील ( सध्या रा. खराबवाडी, चाकण , ता. खेड , मूळ रा. अहमदनगर ) असे गुन्हा दाखल झालेल्या कथित पत्रकाराचे नाव आहे. चाकण मधील एका शासकीय महिला अधिकारी यांनी चाकण पोलिसांत या बाबत तक्रार दिली आहे. चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित महिला अधिकारी यांना मागील काही दिवसांत वारंवार भेटून त्यांच्या दिसण्यावर अत्यंत अश्लील टिपण्या आशिष ढगे याने केल्या होत्या. संबंधित महिला अधिकारी यांच्या कुटुंबियांच्या समोर देखील त्याने असे प्रकार केले होते. संबंधित माहिला अधिकारी यांना कथित पत्रकार ढगे याने त्यांच्या कार्यालयात जाऊन धमकी दिल्याचा प्रकार देखील घडला होता. चाकण पोलिसांनी संबंधित शासकीय अधिकारी महिला यांच्या तक्रारी वरून विनयभंग, धमकी , शासकीय कामात अडथळा अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर कथित पत्रकार ढगे फरारी झाला असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. अधिक तपास चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड व त्यांचे सहकारी करत आहेत.
अनेकांच्या तक्रारी चाकण औद्योगिक भागातील विविध गावांमध्ये अनेक शैक्षणिक संस्था , शिक्षक, व्यवसायिक, उद्योजक आणि व्यक्ती यांना संबंधित आशिष ढगे याने संकेतस्थळावर बातम्या देऊ , तक्रारी करू अशा धमक्या देऊन वेगवेगळ्या कारणाने त्रस्त केल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. चाकण औद्योगिक भागात काही महिलांना हाताशी धरून खोट्या तक्रारी करण्यास भाग पाडून त्यामध्ये तडजोडी करून मोठ्या मोठ्या रकमांची मागणी केल्याच्या तक्रारी देखील समोर आल्या आहेत.
तोतया पत्रकारांचे पेव
चाकण मध्ये मोठ्या प्रमाणावर तोतया पत्रकार उदयास आले असून त्यांच्याकडून गैरप्रकार , जमिनींचे ताबे, शासकीय कार्यालयात उठबस व तडजोडी, बदनामीच्या धमक्या देऊन वेगवेगळ्या मागण्या करण्यात येत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत.