तीन अज्ञात पुरूषांनी तरुणीला लोणावळा येथील एका अज्ञात ठिकाणी जबरदस्तीने नेले आणि तिच्यावर बलात्कार केला व नंतर कारमधून पुलावर फेकून दिल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. परंतू, तपासात धक्कादायक खुलासा झाला आहे. ही तरुणी तिच्या ओळखीच्या दुकानदारासोबत रात्रभर होती, असे समोर आले आहे. महिलेने आणि त्या दुकानदाराने रचलेला कांगावा उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.
सामुहिक बलात्काराची घटना घडल्याने पुणे ग्रामीण पोलिसांनी सुत्रे हलविण्यास सुरुवात केली होती. तपासावेळी महिलेने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये मोठी तफावत आढळून आली. तपासात पोलिसांना तिच्यासोबत केवळ एकच पुरुष होता, तो देखील तिच्या ओळखीचा होता, असे आढळले. यामुळे पोलिसांनी तिच्यासोबत असलेल्या तुंगार्ली येथील ३५ वर्षीय दुकानदाराला ताब्यात घेतले आहे.
शुक्रवारी ही घटना घडल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले होते. शुक्रवारी रात्री तीन पुरूषांनी तिला कारमध्ये जबरदस्तीने बसविले आणि अज्ञात स्थळी नेऊन बलात्कार केल्याची तक्रार या तरुणीने पोलिसांत केली होती. तसेच शनिवारी पहाटे या तिघांनी तिला लोणावळा येथे सोडून पळ काढला होता. या प्रकरणी शनिवारी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात तिच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला होता. तरुणीला ज्या भागात सोडले त्या भागातील सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले, यामध्ये एकाच व्यक्तीने तिला या भागात सोडल्याचे समोर आले आणि बलात्काराचा कांगावा समोर आला. काही आठवड्यांपूर्वी कोंढव्यात देखील असाच बलात्काराचा कांगावा करण्यात आला होता.