किरण शिंदे
पुणे- पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक थरारक घटना उघडकीस आली आहे. मध्यरात्री दीडच्या सुमारास एका तरुणाला पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश रामनायक निसार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याने आपल्या पत्नीची गळा दाबून हत्या केली होती. मृत महिलेचे नाव बबीता राकेश निसार आहे. सोमवारी रात्री उशिरा वैयक्तिक कारणातून रागाच्या भरात राकेशने पत्नीची हत्या केली आणि नंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला.
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
हत्या केल्यानंतर राकेश बबीताचा मृतदेह दुचाकीवर घेऊन भूमकर पुलाकडून स्वामीनारायण मंदिराच्या दिशेने निघाला होता. याच दरम्यान, गस्त घालत असलेल्या आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलीस पथकाला संशय आल्याने त्यांनी त्याला अडवले. चौकशीत सत्य समोर येताच पोलिसांनी त्वरित कारवाई करत राकेशला ताब्यात घेतले.
या घटनेमुळे पुणे शहर पुन्हा एकदा हादरले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. आरोपी राकेशविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.