पुणे : शहरात दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये गुन्हे शाखेच्या अमली विरोधी पथक १ आणि २ ने कारवाई करत तब्बल ८४ लाखांचे अमली पदार्थ जप्त केले. गुरूवारी (दि. २३) पथक १ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उल्हास कदम हे कर्मचाऱ्यांसह कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलिस कर्मचारी संदीप शिर्के यांना मिळालेल्या माहितीनंतर कोरेगाव पार्क येथील क्लोअर गार्डन सोसायटी परिसरात प्रणव नवीन रामनानी (१९, रा. बंडगार्डन) आणि गौरव मनोज दोडेजा (१९, रा. कोरेगावपार्क) यांच्या ताब्यातून ६७ लाख ८ हजारांचा २ ग्रॅम ७८ मिली ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. तसेच १३६ ग्रॅम ६४ मिली ग्रॅम ओजीकुश गांजा आणि दोन महागड्या कारही जप्त करण्यात आल्या. तर दुसर्या कारवाई अमली पदार्थ विरोधी पथक २ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड हे त्यांच्या कर्मचाऱ्यांसह लोणी काळभोर परिसरात गस्त घालत होते.यावेळी पोलिस कर्मचारी योगेश मांढरे यांना एक राजस्थानी व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. यावेळी पथकाने लोणकर वस्ती येथील ज्ञानाई बंगल्यासमोरील सार्वजनिक रस्त्यावरून भरतकुमार दानाजी राजपुरोहीत (३५) आणि आशुसिंग गुमानसिंग (दोघे रा. जालोर, राजस्थान) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी त्यांच्याकडून तब्बल ४० किलो ३९० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. त्यांच्यावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक १ चे वरिष्ठ निरीक्षक उल्हास कदम, पथक २ चे सुदर्शन गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे, उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, अनिल जाधव, कर्मचारी युवराज कांबळे, प्रशांत बोमादंडी, चेतन गायकवाड, रविंद्र रोकडे, आझाद पाटील, साहिल शेख आणि दिनेश बास्टेवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.
गुन्हे शाखेच्या पथकांकडून ८४ लाखांचे अमली पदार्थ जप्त
By नितीश गोवंडे | Updated: January 24, 2025 20:48 IST