भातरोपांवर खेकड्यांची धाड
By Admin | Updated: July 6, 2015 04:55 IST2015-07-06T04:55:30+5:302015-07-06T04:55:30+5:30
उगवण झालेल्या भातरोपांचा फडशा पाडण्यासाठी खेकडे तुटून पडले आहेत. खेकड्यांचा वाढता उपद्रव शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे.

भातरोपांवर खेकड्यांची धाड
कामशेत : उगवण झालेल्या भातरोपांचा फडशा पाडण्यासाठी खेकडे तुटून पडले आहेत. खेकड्यांचा वाढता उपद्रव शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे. पावसाअभावी रोपांचा तुटवडा पडण्याची शक्यता वाढली आहे. त्यातच खेकड्यांच्या हल्ल्यात रोपांचे नुकसान टाळण्यासाठी, त्यावर प्रतिबंध करण्यासाठी विषारी औषधांचा वापर केला जात आहे.
खेकडे पकडण्यासाठी रात्री शिवारात हिराळाच्या (मशाली) उजेडात आदिवासी जात आहेत. खेकडे बाजारात विकून कातकऱ्यांना रोजगार मिळत आहे. मागील पंधरवड्यात कामशेतसह परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. ओढे-नाले वाहू लागले. झऱ्यांना पाणी आले. नदीपात्रात पाण्याची वाढ झाली. भातखाचरात पाणी तुंबले. पेरलेल्या रोपांची उगवण झाली. रोपांच्या वाढीसाठी त्यावर खतांची मात्रा दिली अन् पावसाने उघडीप दिली. पावसाच्या उघडिपीने बळीराजाची चिंता वाढली आहे.
हिरव्या लुसलुशीत कोवळ्या रोपांवर खेकडे तुटून पडले आहेत. दिवसेंदिवस रोपांचा पडशा पाडत आहे. सोयी-सोयीने रोप खात आहेत. मुळातच उगवणीसाठी गरजेचा पाऊस थांबला आणि खेकड्यांनी रोपांवर ताव मारायला सुरुवात केली. खेकड्यांच्या प्रतिबंधासाठी विषारी औषधांचा वापर करून बळीराजा रोपे जगवू लागला. मात्र, खेकड्यांना मारण्यासाठी वापरलेल्या विषारी औषधांची मात्रा खाचरात तशीच राहत आहे. त्याचा दुष्परिणाम धान्यात विषारी मात्रा राहिल्याने होतो. औषधाने मेलेले खेकडे खाणेही अपायकारक ठरू शकते. बाजारात पन्नास ते शंभर रुपयाला खेकड्याचा वाटा विकला जातो. कातकरी, आदिवासी आणि खेकड्याचा रस्सा खाणाऱ्या खवय्यांची खेकडे पकडण्यासाठी झुंबड उडाली आहे. लाल, काळी खेकडी पकडून त्यांचा रस्सा चवीने चाखला जात आहे. मात्र, शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत असून लावणी करून वारीवर जाण्याच्या तयारीत तो आहे. (वार्ताहर)