बाणेर-बालेवाडी येथील कोविड हॉस्पिटल कायमस्वरूपी रुग्णसेवेत राहणार : अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 19:41 IST2020-08-28T19:39:32+5:302020-08-28T19:41:31+5:30
शहरातील कोविड बाधित गंभीर रुग्णाच्या उपचारासाठी हे हॉस्पिटल महापालिकेने अवघ्या २० दिवसात तयार केले..

बाणेर-बालेवाडी येथील कोविड हॉस्पिटल कायमस्वरूपी रुग्णसेवेत राहणार : अजित पवार
पुणे : कोरोनाबाधित रुग्णसंख्या कमी करण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात सर्व सोयी सुविधा, ऑक्सिजनयुक्त बेडची व्यवस्था असणारे कोविड हॉस्पिटल सुरु करण्यात येत असून, या सर्व हॉस्पिटलमध्येबाणेर-बालेवाडी येथील कोविड हॉस्पिटल अतिशय उत्तम असल्याचे मत उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. तसेच कोविड-१९ चा प्रभाव संपल्यानंतरही हे हॉस्पिटल शहराच्या पश्चिम भागासाठी कायमस्वरूपी रुग्णसेवेत राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पवार म्हणाले, या हॉस्पिटलच्या उभारणीत उद्योजक, महापालिकेचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना या सर्वांनी चांगले काम केले आहे. यांच्या माध्यमातून चांगली आरोग्य सेवा दिली जाईल. अशावेळी आपण सर्वांनी तोंडाला मास्क लावणे, सामजिक अंतर राखणे या नियमांचे देखील पालन केले पाहिजे. जिल्ह्यातील कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे, असेही ते म्हणाले.
महापालिकेने सीएसआरच्या व विविध संस्थांच्या सहकार्यातून उभारलेल्या या हॉस्पिटलचा पुणेकरांना चांगला उपयोग होईल, असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
उदघाटन कार्यक्रमात हे कोविड हॉस्पिटल उभारणीसाठी ज्यांची मोलाची साथ मिळाली अशा व्यक्तीचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
----------
शहरातील कोविड बाधित गंभीर रुग्णाच्या उपचारासाठी हे हॉस्पिटल महापालिकेने अवघ्या २० दिवसात तयार केले असून, यामध्ये ३१४ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. हे सर्व बेड आयसीयु व व्हेंटिलेटरचे आहेत. सीएसआरच्या माध्यमातून व विविध संस्थांच्या सहकार्यातून हे हॉस्पिटल उभे राहिले आहे.