Country needs another Green Revolution: Rakesh Mohan | देशाला दुसऱ्या हरित क्रांतीची गरज :  राकेश मोहन 
देशाला दुसऱ्या हरित क्रांतीची गरज :  राकेश मोहन 

ठळक मुद्दे कृषी पूरक उद्योगांवर लक्ष देण्याची आवश्यकताकारची संख्या वाढतेय, करदात्यांची नाही

पुणे : उद्योग हा देशाच्या आर्थिक स्थितीचा कणा असतो. उत्पादनक्षम उद्योगांना प्रोत्साहन देताना कृषी आणि पूरक उद्योगांकडे देखील लक्ष द्यायला हवे. कृषी म्हणजे केवळ डाळी आणि धान्य असा विचार न करता त्या जोडीला मत्स्य शेती, दूध आणि दूध प्रक्रिया उद्योग, शेतमाल प्रक्रिया उद्योग अशी साखळीच उभारावी लागेल. त्यासाठी दुसरी कृषी क्रांती होण्याची गरज असल्याचे मत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) माजी डेप्युटी गव्हर्नर डॉ. राकेश मोहन यांनी व्यक्त केले. 
पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अ‍ॅँण्ड इकोनॉमिक्सच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात  ‘मूव्हींग इंडिया टून अ न्यू ग्रोथ ट्रॅजेक्टरी’ या विषयावर ते मंगळवारी बोलत होते. टाटा सन्सचे नॉन एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर इशात हुसैन उपस्थित होते. 
डॉ. मोहन म्हणाले, देशाची आर्थिक प्रगती व्हायची असेल तर तुमच्या उद्योग क्षेत्राची प्रगती व्हायला हवी. त्यात गेल्या काही वर्षांमधे वाढ होताना दिसत नाही. त्याच सोबत कृषी, ऊर्जा आणि पायाभूत सुविधांमधे वाढ झाली पाहिजे. या सर्वांसाठी कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आवश्यक असल्याने सर्वांना माध्यमिक शिक्षण मोफत दिले पाहीजे. उद्योगांमधे अधिकाधिक तंत्रज्ञान वाढविले पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकतील असे उद्योग निर्माण केले पाहिजे. तसेच, तयार झालेल्या उत्पादनाला शाश्वत बाजारपेठ मिळेल, यावर लक्ष द्यायला हवे. देशासह आशियाई देशांची एकूण लोकसंख्या ४ अब्ज आहे. आपल्या आजुबाजूलाच मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. त्या संधीचा उपयोग केला पाहिजे. 
औद्योगिक संस्थांच्या उभारणी पाठोपाठ कृषी आणि पूरक उद्योगाची वाढ झाली पाहिजे. आता धान्य व डाळी यावर आपण थांबता कामा नये. शेतकऱ्यांनाच पिकविलेल्या मालाचे पूरक उद्योग उपलब्ध करुन द्यायला हवेत. आपल्या आहारामधे कोणकोणते घटक वापरले जातात, हे पाहून उद्योगांची निर्मिती करावी. मत्स्यशेती, दूग्ध पदार्थांपासून उपपदार्थ अशा विविध प्रक्रिया उद्योगांसाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्या जोडीला वाहतूक व साठवणुकीची सुविधा उभारायला पाहिजे, असे डॉ. मोहन म्हणाले. 
---
कारची संख्या वाढतेय, करदात्यांची नाही
देशाच्या उभारणीसाठी करसंकलन हा एक महत्त्वाचा घटक असतो. मात्र, देशात चारचाकी वाहनांची संख्या वाढत असली तरी करदात्यांच्या संख्येत फारशी वाढ होताना दिसत नाही. उलट एकूण सकल उत्पन्नाच्या तुलनेत करदात्यांच्या टक्केवारील गेल्या दहा वर्षांत १२वरुन अकरापर्यंत घटझाली आहे. अगदी पुण्याचे उदाहरण घ्यायचे झाल्यास, अनेक आलिशान संकुले उभारलेली दिसतात. त्या तुलनेत करदात्यांची संख्या फारशी नाही. कराच्या टक्क्यात नव्हे, तर दात्यांच्या संख्येत वाढ झाली पाहीजे, असे डॉ. राकेश मोहन म्हणाले. 


Web Title: Country needs another Green Revolution: Rakesh Mohan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.