‘सराईत’ तयार होऊ नयेत यासाठी गुन्हेगारांचे समुपदेशन
By Admin | Updated: January 5, 2015 00:59 IST2015-01-05T00:59:45+5:302015-01-05T00:59:45+5:30
गुन्हेगारीच्या एखाद्या कृत्याने ‘सराईत’पणाचा शिक्का बसणाऱ्यांची संख्या वाढत असून, होतकरू तरुणांचे आयुष्य बर्बाद होऊ नये यासाठी पोलिसांकडून आता समुपदेशन करण्यात येणार

‘सराईत’ तयार होऊ नयेत यासाठी गुन्हेगारांचे समुपदेशन
लक्ष्मण मोरे, पुणे
गुन्हेगारीच्या एखाद्या कृत्याने ‘सराईत’पणाचा शिक्का बसणाऱ्यांची संख्या वाढत असून, होतकरू तरुणांचे आयुष्य बर्बाद होऊ नये यासाठी पोलिसांकडून आता समुपदेशन करण्यात येणार आहे. यासाठी विविध सामाजिक संस्था आणि मानसोपचार तज्ज्ञांचीही मदत घेतली जाणार आहे.
गेल्या १० वर्षांत पुण्यात विविध स्वरूपांचे गुन्हे दाखल असणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. या काळात ४६ जणांवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे त्यातील तब्बल १३ हजार गुन्हे हे हाणामारीच्या घटनांचे आहेत. हाणामारीच्या एखाद्या घटनेत तरुणाचा किरकोळ सहभाग असला, तरी त्याच्यावर गुन्हेगारीचा शिक्का बसतो. यातून अनेकदा हे तरुण सावरतच नाहीत, असे पुणे पोलिसांनी केलेल्या अभ्यासात सिद्ध झाले आहे.
याबाबत परिमंडळ २ चे उपायुक्त सुधाकर पठारे म्हणाले, ‘‘ चार महिन्यांपूर्वी हमालनगर येथे एक मारामारीची घटना घडली होती. जखमीने संशयितांच्या सांगितलेल्या नावांमध्ये दोन अगदी हुशार नवयुवकांचा सहभाग होता. इतरांना जामीन मंजूर झाला; परंतु या दोघांना मात्र झाला नाही. त्यांना मदत करण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचीही भेट घेतली. मात्र, पुरावे या दोघांविरुद्ध या तरुणांना कारागृहातच राहावे लागले. ही एक घटना समोर आली,परंतु कदाचित असे अनेक तरुण चुकीमुळे वा गैरसमजुतीने गुन्हेगारीकडे येणे टाळण्यासाठीच पोलिसांकडून गुन्हेगारांचे समुपदेशन करण्याची कल्पना सुचली.’’
पोलिसांनी गेल्या दहा वर्षांच्या गुन्हेगारीच्या केलेल्या अभ्यासात ‘रेकॉर्डवरील गुन्हेगार’ ही संख्या वाढत आहे. पुण्यात सध्या १०,५०२ रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. तर, जामिनावर सुटल्यावर किंवा कारागृहातून बाहेर आल्यावर दुसऱ्यांदा गुन्हा करणाऱ्यांची संख्या साडेतीन हजारांवर आहे. पुण्याच्या लोकसंख्येत गुन्हेगारीचे प्रमाण १ टक्का असले, तरी त्याचा समाजावर होणारा परिणाम मोठा आहे. त्यामुळे गुन्हेगारी रोखतानाच ‘सराईत’ तयार होऊ नये, यासाठी पोलिसांचा प्रयत्न आहे. ’’
या उपक्रमाचा पहिला टप्पा म्हणून पोलिसांनी आयोजित केलेल्या ‘संवाद परिवर्तनाचा’ या उपक्रमात पोलिसांनी शहरातील सर्व झोपडपट्ट्या, महाविद्यालयांमधील तरुणांबरोबर ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत अशा तरुणांनाही बोलावले होते. पोलिसांना शत्रुत्वाच्या नजरेतून पाहणारे गुन्हेगार किमान यानिमित्ताने पोलिसांशी संवाद साधतील.