सभेतच नगरसेवकांत हाणामारी
By Admin | Updated: June 21, 2016 00:30 IST2016-06-21T00:30:29+5:302016-06-21T00:30:29+5:30
पाणीटंचाई संदर्भात जुन्नर नगरपालिकेने बोलाविलेल्या तातडीच्या सभेतच सत्ताधारी राष्ट्रवादी व विरोधी शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेवकांनी एकमेकांचा पाणउतारा करत चर्चा

सभेतच नगरसेवकांत हाणामारी
जुन्नर : पाणीटंचाई संदर्भात जुन्नर नगरपालिकेने बोलाविलेल्या तातडीच्या सभेतच सत्ताधारी राष्ट्रवादी व विरोधी शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेवकांनी एकमेकांचा पाणउतारा करत चर्चा न करता खुर्च्या फेकून मारण्याचा प्रकार घडला. मुद्द्यावरून गुद्द्यावर येण्याचा लाजीरवाणा प्रसंग नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला.
राष्ट्रवादीचे नगरसेवक दिनेश दुबे व शिवसेना गटनेते मधुकर काजळे यांच्यात ही बाचाबाची व धराधरी झाली. माणिकडोह धरणाची पाणीपातळी खालावल्याने तसेच कुकडी नदी कोरडी पडल्याने शहरात १९७२ तसेच १९८४ नंतर सध्या शहरात तशी पाणीटंचाई भासत आहे. शहरात अवघा ७ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा बंधाऱ्यात असल्याने चार दिवसाआड नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालिकेच्या वतीने तातडीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सभेची चर्चा पुढे जात असतानाच, शिवसेनेचे गटनेते आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी खटाटोप करतात, कामांची प्रसिद्धी करतात, असा आरोप माजी नगराध्यक्ष दिनेश दुबे यांनी मधुकर काजळे यांच्यावर केला. त्याला काजळे यांनी प्रत्युत्तर दिल्याने वादाला अधिकच तोंड फुटले.
याच वादावादीतून एकमेकांवर खुर्र्च्या फेकण्याचा, पाण्याच्या बाटल्या फेकण्याचा प्रकार घडला. दरम्यान, शाब्दिक चकमकीबरोबरच अश्लाघ्य भाषेत धराधरीचा प्रसंग गुदरला. हे पाहून महिला नगरसेवकांनी काढता पाय घेतला तर सभागृह अवाक झाले. सभागृहात सर्वपक्षीय १३ नगरसेवक असताना हा प्रकार घडला. त्यातच मध्यस्थी करण्यासाठी माजी उपनगराध्यक्ष शाम पांडे यांनी प्रसंगावधान दाखविल्याने पुढील प्रसंग टळला. दरम्यान, नगरपालिका सभागृहात झालेल्या गोंधळाचा आवाज मोठ्याने बाहेर आल्याने नागरिकांची सभागृहाबाहेर गर्र्दी झाली. (वार्ताहर)
कोणालाही अंगावर घेण्याची तयारी...
याबाबत सत्ताधारी पक्षाचे दिनेश दुबे यांना विचारले असता ते म्हणाले, की शिवसेना गटनेते काजळे यांनी एकही विकासकाम केलेले नाही. कोणताही निधी विकासासाठी आणलेला नाही. सत्ताधारी म्हणून आम्ही विकासकामे केली. असे असताना केवळ श्रेय लाटण्यासाठी प्रसिद्धीचा खटाटोप करतात. आमचे बहुमत असतानादेखील विरोधी सदस्यांचे ठराव जनतेच्या हितासाठी आम्ही स्वीकारले. विधायक कामासाठी राजकारण केले नाही. तरीही जर नागरिकांच्या कामात कोणी अडथळे आणत असेल तर त्यासाठी कोणालाही अंगावर घेण्याची आमची तयारी आहे. झालेला प्रकारदेखील नागरिकांच्या हितासाठी घडला आहे.
दडपशाहीला भीक घालणार नाही...
शिवसेना गटनेते काजळे यांना विचारले असता, सत्ताधारी नगरसेवकांनी शहरातील महत्त्वाच्या समस्या सोडविता येत नसल्याने वैफल्यग्रस्त होऊन पालिका सभागृहात दबंगशाही दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र आमची भूमिका ही नागरिकांच्या हितासाठीच आहे. विरोधी पक्षाला विरोधीपणाने काम करावेच लागते. सत्ताधाऱ्यांच्या दडपशाहीला भीक घालणार नाही. नागरिकांसाठी विधायक विरोध करतच राहणार.
सत्ताधाऱ्यांचे अपयश उघड करण्यासाठी प्रसंगी आमची विरोधाची भूमिका अधिक
तीव्र होईल.