मुख्य सभेत निरोप घेताना भावुक झाले नगरसेवक

By Admin | Updated: March 15, 2017 03:42 IST2017-03-15T03:42:24+5:302017-03-15T03:42:24+5:30

महापालिकेच्या मावळत्या सभागृहातील सभासदांची शेवटची निरोपाची मुख्य सभा मंगळवारी पार पडली. सलग २५ वर्षांपासून सभागृहात असलेल्या सभासदांसह पहिल्यांदाच

The corporator, who was emotionally disturbed while leaving the main meeting, | मुख्य सभेत निरोप घेताना भावुक झाले नगरसेवक

मुख्य सभेत निरोप घेताना भावुक झाले नगरसेवक

पुणे : महापालिकेच्या मावळत्या सभागृहातील सभासदांची शेवटची निरोपाची मुख्य सभा मंगळवारी पार पडली. सलग २५ वर्षांपासून सभागृहात असलेल्या सभासदांसह पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकांसह ८५ सभासदांना निरोप देण्यात आला. ईव्हीईम मशीनचा गोंधळ, निवडणूक यंत्रणेतील अधिकाऱ्यांचा पक्षपातीपणा यामुळे पराभवाला सामोरे जावे लागल्याची भावना सभासदांनी या वेळी व्यक्त केली. सभागृहात नसलो तरी रस्त्यावरची लढाई यापुढील काळातही लढत राहण्याचा निर्धार या वेळी काही सभासदांनी व्यक्त केला.
महापालिकेच्या १५२ जुन्या सदस्यांपैकी सभागृहात ६७ नगरसेवक पुन्हा निवडून आले. मात्र उर्वरित ८५ नगरसेवक नवीन सभागृहामध्ये असणार नाहीत. त्यापैकी काहींनी निवडणूक लढवलेली नाही तर काहींना पराभव स्वीकारावा लागला आहे. या सभासदांना भावपूर्ण निरोप मंगळवारी देण्यात आला. बुधवारी महापौर व उपमहापौर यांची निवड होऊन नवीन सभागृह अस्तित्वात येणार आहे.
महापौर प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘मला महापौर म्हणून १ वर्षे १९ दिवस काम करता आले. महापौर म्हणून काम करण्यासाठी पक्षाकडून मला खूप स्वातंत्र्य मिळाले. सायकल फिरणारा प्रशांत जगताप लाल दिव्याच्या गाडीतून शहराच्या कानाकोपऱ्यात फिरला.’’
बंडू केमसे म्हणाले, ‘‘गेल्या ५ वर्षांच्या कालावधीमध्ये सर्व पक्षांचे नगरसेवक, अधिकारी यांनी चांगले सहकार्य केले आहे. निवडून येऊ शकलो नसलो तरी फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार समाजामध्ये रुजविण्यासाठी यापुढील काळात प्रयत्नशील राहणार आहे.’’
किशोर शिंदे म्हणाले, ‘‘निवडून आलो नसलो तरी शहराच्या प्रश्नांवर सातत्याने आंदोलन करीत राहू. विकासाच्या प्रश्नांवर आयुक्तांकडे पाठपुरावा करू’’
अशोक हरणावळ म्हणाले, ‘‘पराभवासाठी मी कोणालाही दोषी धरणार नाही. माझ्या पराभवानंतर घरासमोर शेकडो लोक जमा झाली होती. या लोकांच्या प्रेमापोटीच यापुढे काम करीत राहणार आहे.’’
कमल व्यवहारे म्हणाल्या, ‘‘ २५ वर्षांपूर्वी सभागृहात पहिल्यांदा निवडून आले तेव्हा केवळ दोन लाख रूपयांचा विकास निधी मिळाला होता. त्यानंतर या निधीमध्ये मोठयाप्रमाणात वाढ होत गेली. ईव्हीएम मशीनमुळे आमचा पराभव झाला.’’
अभय छाजेड म्हणाले, ‘‘अनेकदा नियोजित नसलेली कामे अचानक घुसडली जात आहेत, हा पायंडा चुकीचा आहे. पालिकेने उत्पन्नाची साधने वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत.’’ मुकारी अलगुडे, अशोक येनपुरे, धनंजय जाधव, रूपाली पाटील, मिनल सरवदे, मनिषा घाटे, पुष्पा कनोजिया, नंदा लोणकर, बाबू वागस्कर, अस्मिता शिंदे, स्मिता वस्ते यांनी मनोगत व्यक्त केले.

शेवटच्या सभेत अनेक किस्से सांगत सभासदांनी रंग भरला. ‘‘निवडणुकीचा निकाल यायला सुरुवात झाल्यानंतर भाजपाने आम्हाला एसपी कॉलेजपासून पर्वतीपर्यंत मार देत नेले. सदाशिव पेठेतील बॅलेट मशीन उघडल्यानंतर तर अशोक गायबच झाला’’ अशी मिश्कील टिप्पणी अशोक हरणावळ यांनी केली.
‘‘लढता, लढता हरलो, तरी हरण्याची खंत नाही, शांत बसायला आम्ही संत नाही’’ या रूपाली पाटील यांच्या कवितेच्या ओळींना दाद मिळाली.

आत्मपरीक्षणाची गरज
निवडणुकीत आपला पराभव का झाला याचे आत्मपरीक्षण सगळ्यांनी करण्याची गरज आहे. निवडणुकीपूर्वी काँग्रेस ही राष्ट्रवादीला आपला शत्रू मानत होती. काँग्रेस पक्षांतर्गतच खेचाखेची करण्यात येत होती. निवडणुकीत भाजपाचा मुकाबला करण्यासाठी सक्षम नेतृत्व पुढे येऊ शकले नाही, असे स्पष्ट मत विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी व्यक्त केले.

फुली मारून पुढे जा
शेवटच्या सभेत अनेक नगरसेवकांनी ईव्हीएम मशीनला जबाबदार धरले. त्यानंतर बोलताना महापौर प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘जो निकाल आला आहे, तो स्वीकारून पुढे जाण्याची आवश्यकता आहे. मनाची चुकीची समजूत करून घेऊ नये.’’ त्यानंतर डोंबिवली फास्ट या चित्रपटातील डॉयलॉग सांगताना महापौर म्हणाले, ‘‘ज्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळत नाहीत, अशा प्रश्नांना फुली मारून पुढे जायचे असते. अन्यथा त्या प्रश्नांमध्ये गुंतून आयुष्य बरबाद होते.’’

Web Title: The corporator, who was emotionally disturbed while leaving the main meeting,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.