तीन हजार रुपयांसाठी गमावली पालिकेची नोकरी

By Admin | Updated: August 11, 2015 03:54 IST2015-08-11T03:54:57+5:302015-08-11T03:54:57+5:30

सदनिकेचे हस्तांतर प्रमाणपत्र देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच घेतल्याचे सिद्ध झाल्याने भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील लिपिक खंडू शेलार याला नोकरीवरून बडतर्फ करण्यात आले आहे.

The corporation's job for three thousand rupees is lost | तीन हजार रुपयांसाठी गमावली पालिकेची नोकरी

तीन हजार रुपयांसाठी गमावली पालिकेची नोकरी


पुणे : सदनिकेचे हस्तांतर प्रमाणपत्र देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच घेतल्याचे सिद्ध झाल्याने भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील लिपिक खंडू शेलार याला नोकरीवरून बडतर्फ करण्यात आले आहे. लाच घेतल्याप्रकरणी शेलार याला दीड वर्ष कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे, या पार्श्वभूमीवर प्रशासन विभागाने ही कारवाई केली आहे.
भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये आईच्या नावावरील फ्लॅट स्वत:च्या नावावर हस्तांतर करण्यासाठी तक्रारदार यांनी अर्ज जानेवारी २०१४ मध्ये केला होता. त्यापोटी त्यांनी ४५० रुपयांचे शुल्क महापालिकेकडे भरले होते, मात्र वारंवार चकरा मारूनही शेलार यांच्याकडून त्यांचे काम करून दिले जात नव्हते. हस्तांतर प्रमाणपत्र देण्यासाठी शेलार याने त्यांच्याकडे ३ हजार रुपयांची लाच मागितली.
शेलार यांच्या त्रासाला कंटाळून तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली, त्यानुसार सापळा रचून शेलार यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयाला याप्रकरणी ठोस पुरावे आढळून आल्याने शेलार याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानुसार प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून शेलार यांना नोकरीवरून बडतर्फ केले असल्याची माहिती सेवकवर्ग विभागाचे उपायुक्त मंगेश जोशी यांनी दिली.
लाचलुचपत प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी मुख्य सभेची परवानगी घेणे बंधनकारक होते, मात्र मुख्य सभेकडून परवानगी मिळत नसल्याने अनेक प्रकरणे प्रलंबित राहत होती. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने २०११ मध्ये मुख्य सभेचे परवानगी देण्याचे अधिकार काढून घेऊन आयुक्तांना दिले. आयुक्तांकडून आरोपपत्र दाखल करण्यास तातडीने परवानगी दिली जात आहे.

वर्षभराच्या आत खटले निकाली
लाचलुचपतप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर एक वर्षाच्या आत खटले निकाली निघू लागले आहेत. शेलार यांचा खटला एक वर्षाच्या आत निकाली निघून त्यांना शिक्षा झाली. तसेच अभियंत्याचा लाच घेतल्याचा खटला ७ महिन्यांत निकाली
निघाला आहे.

Web Title: The corporation's job for three thousand rupees is lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.