CoronaVirus News: कोरोनाचा १२५ कोटींचा हिशेब मागताच सत्ताधारी भाजपाकडून पुणे पालिकेची सभा तहकूब
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 07:13 IST2020-06-18T04:42:43+5:302020-06-18T07:13:48+5:30
तीन महिन्यांत पालिकेची मुख्य सभाच झाली नव्हती. त्यामुळे अनेक नगरसेवकांचे पद धोक्यात आले होते.

CoronaVirus News: कोरोनाचा १२५ कोटींचा हिशेब मागताच सत्ताधारी भाजपाकडून पुणे पालिकेची सभा तहकूब
पुणे : महापालिकेची मुख्य सभा विरोधी पक्षांच्या आक्रमकतेने सुरू झाली. ‘कोरोना’वर केलेल्या १२५ कोटींच्या खर्चाचा हिशेब विरोधी पक्षांनी मागताच बहुमताच्या जोरावर सत्ताधाऱ्यांनी सभा तहकूब केली.
तीन महिन्यांत पालिकेची मुख्य सभाच झाली नव्हती. त्यामुळे अनेक नगरसेवकांचे पद धोक्यात आले होते. त्यांची हजेरी लावून घेण्याकरिता बोलावलेल्या या मुख्य सभेला जवळपास १०० नगरसेवक उपस्थित होते. सभेला सुरुवात होताच काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे व नगरसेवक दिलीप बराटे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा घडवून आणण्याची मागणी केली. कोरोनावर आतापर्यंत किती खर्च झाला, प्रशासन नेमके काय करीत आहे, पुढची काय तयारी आहे, रुग्णसंख्या का वाढत आहे आदी माहिती सभागृहाला मिळाली पाहिजे, यासाठी विरोधक आक्रमक झाले.
त्यानंतर सभागृह नेते धीरज घाटे यांनी सभा तहकुबी मांडली. त्याला विरोधी पक्षांनी विरोध दर्शवला. त्या वेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मतदान घेण्याची सूचना केली. या वेळी तहकुबीच्या बाजूने ६०, तर विरोधात ३४ मते पडल्यानंतर सभा २१ जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली.